Sangli News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महापुरुषांवर गरळ ओकण्याची मालिकाच सुरु असल्याने राज्यातील पुरोगामी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीमध्ये (Sangli News)आज (3 ऑगस्ट) राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी रणनीती निश्चित केली जाणार आहे. या बैठकीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डाॅ. भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात लढाई करण्याची वेळ
राज्यातील तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात आक्रमक आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पुरोगामी कार्यकर्ते यांची ही बैठक होत आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संघ आणि भाजप सत्तेवर आल्यानंतर बहुजनांचे प्रतिके भंजन, इतिहासातील व्यक्तींचे चारित्र्यहनन सुरु आहे. त्याची सुरुवात जेम्स लेनपासून झाली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब, जगतगुरु संत तुकोबाराय यांच्यासह अनेक महापुरुषांची बदनामी केली जात आहे, पण या तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात लढाई करण्याची वेळ आली आहे.
बेगडी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे खरे स्वरुप जनतेसमोर आणले पाहिजे
सर्व शिव, फुले, शाहू, आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते प्रागतिक पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, सेक्युलर पक्ष व संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे. बेगडी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे खरे स्वरुप जनतेसमोर आणले पाहिजे. त्यासाठी बैठक घेण्यात येत आहे. दरम्यान निवेदनात म्हटले आहे की, अलिकडे तर स्वतःचे खरे नाव लपवून बहुजनांच्या मुलांना फसवणाऱ्या सांगलीतील एका तथाकथित व्यक्तीने शिर्डीचे सुफी संत साईबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मे, तिरंगा ध्वज यांच्याबाबतीत चुकीची विधाने केली आहेत. अशावेळी पुरोगामी संघटनांनी शक्य तितक्या तीव्र प्रतिक्रिया देत आंदोलने केली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या