सांगली : स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचे लोकार्पण सोहळा थोड्याच वेळामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी , मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांच्या उपस्थित होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांची मोठी जंगी सभा होणार आहे. एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राहुल गांधी सांगलीच्या सभेतून फोडणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहत असताना उद्धव ठाकरे मात्र अनुपस्थित राहणार आहेत. तरीही ठाकरे गटाचे कोणी पदाधिकारी उपस्थित राहणार का? याकडे सगळ्यांच लक्ष आहे. 


उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना व्यक्तीगत निमंत्रण


दरम्यान, स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि स्मारकाचे लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मी व्यक्तीगत जाऊन निमंत्रण दिलं होतं. जवळपास अर्धा तास त्यांच्याशी गप्पाही मारल्या, अशी माहिती आमदार विश्वजित कदम यांनी दिली. मात्र, काही घरगुती कारणास्तव ते येऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं, असेही कदम यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचं नाव पत्रिकेत नसल्याचे त्यांनी सांगितले. 


विश्वजित कदम म्हणाले की, लोकसभेनंतर आमच्यात कुठलाही वाद झालेला नाही. आम्ही अनेकदा भेटून व्यवस्थित तेही माझ्याशी बोललेले आहेत. सांगलीचा वाघ संदर्भात मी आता बोलणार नाही. मात्र, दोन ते अडीच लाखांहून अधिक लोक येतील आणि त्यावेळी लोकच काय आहे ते ठरवतील. प्रचाराचा नारळ फोडला अस म्हणता येणार नाही. व्यक्तिगत कार्यक्रम आहे. मात्र, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार या कार्यक्रमासाठी येणे हे माझ्यासाठी फार मोठं असल्याचे विश्वजित कदम म्हणाले. 


राहुल गांधी दिल्लीवरून रवाना


दरम्यान, सांगली दौऱ्यासाठी राहुल गांधी दिल्लीवरून रवाना झाले आहेत. साडेदहा वाजेपर्यंत ते नांदेडमध्ये येतील. नांदेडवरून ते कोल्हापूर विमानतळावर येणार आहेत. कोल्हापूर विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने वांगी कडेगावमध्ये पोहोचतील. याठिकाणी पुतळा आणि सामारकाचं लोकार्पण सोहळा झाल्यानंतर ते तडसर या गावी सभेसाठी रवाना होतील. दुपारी पावणे एक वाजता सभेला सुरुवात होणार आहे. राहुल गांधी यांनी या सभेसाठी एक तास 45 मिनिटांचा वेळ दिला आहे.  त्यानंतर राहुल गांधी कोल्हापूरवरून पुन्हा दिल्लीला रवाना होतील.