सांगली : भाजपचे सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी देखील मागणार नसल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. सुधीर गाडगीळ यांनी 2014 आणि 2019 साली अशा दोन वेळा सांगलीतून विधानसभा निवडणूक लढली होती. त्यात ते विजयी देखील झाले होते. यावेळी देखील भाजपकडून त्यांनाच उमेदवार मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, 2024 ची विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.


निवडणुकीतून संन्यास घेतला असला तरी भाजप पक्षाचेच काम करणार असून पक्ष जो उमेदवार येईल त्याचं प्रामाणिकपणे काम करेल असे देखील त्यांनी त्या लेटरमध्ये म्हटलं आहे. दहा वर्षाच्या कार्यकाळात सांगलीमध्ये अनेक विकासकामे केल्याचे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे. सुधीर गाडगीळ यांनी अचानकपणे लेटर बॉम्ब टाकत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने सांगली भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच आता सांगलीतून भाजपचा उमेदवार कोण असणार याची देखील चर्चा सुरू झाली आहे.


काय म्हटलं आहे पत्रात 


सांगलीकर मायबाप जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे दहा वर्षांपूर्वी मी सांगलीकरांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पोहोचलो. त्या आधीपासूनच आमचे गाडगीळ घराणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांच्या माध्यमातून अनेक वर्षे समाजकारणात होतेच. मीही भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काही वर्षे सांभाळली होती. अनेक निवडणुकीत पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्यांचे पालन मी यशस्वीपणे केले होते. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटनेने मला उमेदवारी दिली जनतेच्या आशीर्वादामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मी विजयी झालो. गेल्या दहा वर्षात सांगलीचा सेवक म्हणून मी जनतेची निष्काम भावनेने सेवा केली. सांगली विधानसभा मतदारसंघातील विविध नागरी प्रश्न तडीस नेण्याचे प्रयत्न केले.


सन 2014 पूर्वी सांगली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब होती, खराब रस्त्यांमुळे जनतेला खूप मोठ्या प्रमाणात जास सहन करावा लागत होता. मी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम सांगलीतील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विधानसभा क्षेत्रातील शहरी भाग, शहराचा विस्तारित भाग तसेच विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न हाती घेतला. खराब रस्ते ही लोकांची सातत्याने डोकेदुखी होती रस्त्यावरून जाणेही मुश्किल होऊन बसले होते, अतिशय दयनीय अवस्था असल्यामुळे ती दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून अनेक रस्ते चांगले केले नव्याने बांधले व चांगले केले त्यामुळे विधानसभा क्षेत्रातील लोकांना मोठा दिलासा मिळाला. सांगलीतील रस्त्यावरून जाणे लोकांना सुसह्य झाले.


सांगलीकरांची अनेक कामे या दहा वर्षांत मार्गी लावल्याचे समाधान मला आहे. आई वडिलांनी लहानपणापासून सेवा धर्माचे संस्कार दिले. त्याचप्रमाणे वागण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला. सांगली शहरातील गुंठेवारी वसाहतीचा भाग हा तसा उपेक्षितच रस्ते, लाईट पाणीपुरवठा याबाबत कायमच तेथे नागरिकांच्या तक्रारी असत. या भागाकडे आमदार म्हणून अधिक लक्ष दिले. आमदार निधीतूच्या माध्यमातून अनेक विकासकामे तेथे केली. शामरावनगर आणि सांगली शहरातील अन्य उपनगरांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले. सांगली ही नाट्यपंढरी म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु या नाट्यपंढरीमध्ये सुसज्ज अशा नाट्यगृहाचा अभाव सातत्याने जाणवत होता. सर्व रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षक अशा सुसज्ज नाट्यगृहाची सातत्याने मागणी करीत होते. यासंदर्भात शासनाकडे सतत पाठपुरावा करून सुसज्ज नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. आता हे नाट्यगृह सांगलीच्या विस्तारित भागात लवकरच उभे करण्यात येणार आहे. त्यामुळे विस्तारित भागातील नागरिकांना आणि नाट्य रसिकांना एका सुसज्ज नाट्यगृहाचा लाभ होणार आहे.


दहा वर्षांत सांगलीकरांची अनेक कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. 2018मध्ये सांगली - मिरज कुपवाड महापालिकेत भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले. मी राज्य सरकारच्या माध्यमातूनही मी दैनंदिन नागरी सुविधांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. माझ्या हातून सर्व प्रश्न सोडविले गेले, असा दावा मी करणार नाही जनसंपर्क कार्यालयात नागरिकांशी दैनंदिन संपर्क साधण्याची, त्यांच्या अडीअडचणी ऐकण्याची व्यवस्था तयार केली. भारतीय जनता पार्टीने मला दिलेल्या संधीचे सार्थक करण्याचा आणि पक्षाचा विश्वास सार्थ ठरविण्याचे मी मनापासून प्रयत्न केले. मतदारांनी आपला प्रतिनिधी म्हणून माझ्यावर टाकलेला विश्वास हीच माझ्या कामाची प्रेरणा होती. या विश्वासातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला.


काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी न मागण्याचा निर्णय मी घेतला आहे. राजकारणात कधी तरी थांबलं पाहिजे, या मताचा मी आहे. आमचा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बनला आहे. आमच्या संघटनेची कार्यपद्धती प्रथम देश, नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी मी " अशी आहे. मला पक्षाने दोनदा विधानसभा उमेदवारीची संधी दिली आता माझ्या ऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, असं माझं प्रामाणिक मत आहे. उमेदवारी मागणार नसलो तरी मी पक्षाचे काम यापुढेही करत राहणार आहे. पण आता मला विधानसभा उमेदवारी नको, अशी विनंती मी पक्ष नेतृत्वाला केली आहे. "करुनी अकर्ते होऊनियां गेले, तेणे पंथें चाले तोचि धन्य तोचि धन्य जर्नी पूर्ण समाधानी" अशी माझी या क्षणी भावना आहे. माझ्यावर मतदारांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे प्रेम असेच कायम राहील असा विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्यांना विजयी करणे हाच माझा निर्धार असणार आहे.


माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीतले सर्वच प्रकल्प जे काही अपूर्ण करायचे राहिले असतील जरी मी निवडणुकीच्या राजकारणातनं थांबलो तरी ते प्रकल्प मी लवकरच पूर्णत्वास नेईन मी निवडणुकीच्या राजकारणातून थांबतोय परंतु संघटनात्मक काम तसेच समाजकारण हे मी करतच राहणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांनी मला सांभाळलं मी त्यांना संभाळल मला इथपर्यंत आणलं त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भविष्याची भी अशाच पद्धतीने उभा राहणार आहे. सांगलीकर जनतेने जी मला सेवेची संधी दिली तसेच मला प्रेम व आशीर्वाद दिले ते सांगलीकर जनतेचे प्रेम व आशीर्वाद भविष्यातही असंच माझ्यावर राहो.


इतर महत्वाच्या बातम्या