Jayant Patil: कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर तीनेवळा ईडीची धाड पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी निगडीत संस्थांकडे ईडीचा मोर्चा वळला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनीचे शिलेदार समजले जातात. कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफांच्या साथीने भाजपचा वारू रोखला आहे. दुसरीकडे सांगलीत जयंत पाटील वजन राखून आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रावर भाजपवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कराडमध्ये दोन दिवसांपूर्वी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखानदारीचा मुद्दा उपस्थित करताना मोदींमुळेच कारखाने जिवंत असल्याचे म्हटले होते. 


पश्चिम महाराष्ट्राचे अर्थकारण साखर कारखानदारीवर आहे. हसन मुश्रीफ यांची चौकशी करताना नफ्यात आणि सुस्थितीत असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर धाड टाकण्यात आली. सांगलीमध्येही जयंत पाटील यांची सत्ता असलेल्या जिल्हा बँकेत चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेनंतर खात्यांचे निमित्त करून राजारामबापू पाटील बँकेतील खात्यांची चौकशी करण्यात आली आहे.


सांगलीत ईडीकडून एकाचवेळी पाच व्यापाऱ्यांवर छापे टाकले. आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून या पाच व्यापाऱ्यांकडे एकूण तब्बल 60 अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. रात्री अडीच वाजता ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी आटपून मुंबईकडे रवाना झाले. या पाच व्यापाऱ्यांकडे चौकशी करताना ईडीने व्यापाऱ्याची खाती असलेल्या बँकेत देखील जाऊन चौकशी केली आहे. यामध्ये पेठ येथील राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातही जाऊन ईडीच्या एका पथकाने या व्यापाऱ्यांच्या खात्याबाबत चौकशी केल्याचे समोर आले आहे.


फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर अन् त्यानंतर दोन दिवसात ईडीची नोटीस!


कर्नाटक निवडणुकीत निपाणीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीची संभावना साडे तीन जिल्ह्यातील पक्ष अशी करत हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून मी काय करायचे ते पाहतो अशी टिप्पणी केली होती. यानंतर जयंत पाटील यांनीही फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर तुम्हाला फौजदारचा हवालदार केला आणि तुम्ही आम्हाला बोलणार का? अशी टीका केली होती. यानंतर दोनच दिवसांनी आयएलएफस प्रकरणात जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस आली होती. यानंतरही प्रतिक्रिया देताना जयंत पाटलांनी घरी येऊन हवालदाराने नोटीस दिल्याचे म्हटले होते. हा सुद्धा फडणवीस यांनाच टोला होता.


पाटील पुन्हा टार्गेटवर तर नाहीत ना?


दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नोटिसीनंतर जयंत पाटील चौकशीला सामोरे गेले, पण त्या प्रकरणात फार काही हाती लागलं नसल्याची माहिती आहे. त्यामुळेच आता व्यापाऱ्यांच्या खात्यांच्या माध्यमातून जयंत पाटील पुन्हा टार्गेटवर तर नाहीत ना? अशीच चर्चा सहकार पट्ट्यात रंगली आहे. जयंत पाटील मृदू स्वभावाचे असले, तरी त्यांची टप्प्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम करण्याची शैली अवघ्या प्रश्चिम महाराष्ट्राला माहीत आहे. शरद पवार यांचेही अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. शरद पवार यांनी पायऊतार होण्याचा घेतलेल्या निर्णयानंतर सर्वाधिक भावनावश जयंत पाटील झाले होते. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला होता. 


कोंडी तरी केली जात नाही ना? 


नुकत्याच झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदावरून बाजूला करून पक्ष संघटनेत पद देण्याची जाहीर मागणी केली. सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडेच आहे. जयंत पाटील पहिल्यांदा ईडीच्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर अजित पवार यांचा फोन आला नव्हता, असे जाहीरपणे पाटील यांनी सांगितले होते. याबाबत  बोलताना अजित पवार यांनीही फोन केलेला नाही, म्हणत प्रत्यक्ष भेटणार असल्याचे म्हटले होते. पक्षातील जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातील शीतयुद्ध नवीन नाही. त्यामुळे जयंत पाटील यांची पक्षातून आणि विरोधकांकडूनही कोंडी तरी केली जात नाही ना? अशीही चर्चा आहे. मध्यंतरी जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर तरी नाहीत ना? अशीही चर्चा रंगली होती. एका दैनिकातील बातमीने खळबळ उडवून दिली होती.


ईडीची छापेमारी कोणावर?  


सांगली शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या दिनेश व सुरेश पारेख आणि अरविंद व ऋषिकेश लढ्ढा या बड्या व्यापाऱ्यांसह पिंटू बियाणी या व्यापाऱ्यावर शुक्रवारी सकाळी ईडीच्या पथकाने छापे टाकून तपासणी केली. ईडीचे 60 अधिकारी 11 वाहनांतून शहरात दाखल झाले. प्रत्येक पथकात चार ते पाच अधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. शहरातील शासकीय रुग्णालयामागे त्रिकोणी बागेसमोर दिनेश पारेख आणि सुरेश पारेख या व्यापारी भावांचे शेजारीच बंगले आहेत. दोघेही इलेक्ट्रिक साहित्याचे मोठे पुरवठादार आहेत. 


राजारामबापू बँकेच्या मुख्यालयात चौकशी


राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या पेठ (ता. वाळवा) येथील मुख्यालयातही ईडीचे पथक दाखल झाले. सांगलीतील व्यापाऱ्यांवरील छापे प्रकरणाबाबत ही चौकशी असल्याची चर्चा होती. मुख्य शाखेत अनेक व्यापाऱ्यांची खाती आहेत. सांगलीतील व्यापारी पारेख यांचे खातेही बँकेत आहे. त्यांच्या खात्यावरून जमा-खर्च होतो. बँकेचे व्यवहार रेग्युलर आहेत. मध्यंतरीही काही व्यापारांच्या खात्याबाबत चौकशी झाली होती. पारेख यांच्या खात्यावरील व्यवहारा संदर्भात शंका वाटली म्हणून पथकाने राजारामबापू बँकेच्या पेठ येथील मुख्य शाखेत पथक आले होते. पारेख यांच्या खात्याची चौकशी व तपासणी केल्याची माहिती राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी दिली आहे.