ED Raids : राजारामबापू सहकारी बँकेच्या (Rajarambapu Sahakari Bank) कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रात एकूण 14 ठिकाणी ईडीचे छापे (ED Raids) टाकले. ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी संबंधित आहे. 10 वर्षांपूर्वीच्या 1000 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास ईडी करत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून मोठी रक्कम रोकड स्वरुपात वळती केल्याचा आरोप आहे. हे व्यवहार बँकेने लपवून ठेवल्याचा आरोप आहे. या कथित घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सामील असल्याचा संशय ईडीला आहे. दरम्यान, चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या सीएच्या कार्यालयावर देखील छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. 


दरम्यान जयंत पाटील यांनी या छाप्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


सांगलीत पाच व्यापाऱ्यांवर ईडीने छापे टाकल्याचं समोर


ईडीकडून काल सकाळपासून एकाचवेळी पाच व्यापाऱ्यांवर छापे टाकल्याचे समोर आलं आहे. आर्थिक अनियमिततेच्या कारणावरुन या पाच व्यापाऱ्यांकडे एकूण साठ अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. रात्री अडीच वाजता ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी आटोपून मुंबईकडे रवाना झाले आहेत. या पाच व्यापाऱ्यांकडे चौकशी करताना ईडीने व्यापाऱ्याची खाती असलेल्या बँकेत देखील जाऊन चौकशी केली. यामध्ये  पेठ येथील राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातही जाऊन ईडीच्या एका पथकाने  या व्यापाऱ्यांच्या खात्याबाबाबत चौकशी केल्याचे समोर आलं आहे.


बड्या व्यावसायिकांच्या बंगल्यावर छापा


सांगली शहरातकाल सकाळी ईडीच्या दोन पथकांनी शिवाजीनगरमधील सुरेश आणि दिनेश पारेख बंधू यांच्या दोन बंगल्यात छापा टाकून चौकशी केली होती. पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. त्यांचा शिवाजीनगर परिसरात बंगला आहे. या बंगल्यात आज ईडीचे पथक पहाटेच्या सुमारास चौकशीसाठी आले होते. या पारेख बंधूंचा इलेक्ट्रिकल्सचा मोठा व्यवसाय आहे. सांगली शहरातील गणपती पेठ भागात त्यांची इलेक्ट्रिकलसची दुकान आहेत. आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरुन ही चौकशी करण्यात आली. पारेख बंधूंच्या दोन बंगल्यामध्ये चौकशी करण्याबरोबरच ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी काही बँकांत जाऊन पारेख बंधूंशी संबंधित खात्याची चौकशी देखील करायला सुरुवात केली आहे.


VIDEO : Rajarambapu Cooperative Bank कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रात एकूण 14 ठिकाणी ED ने टाकले छापे



हेही वाचा


Sangli News : सांगलीतील बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा, पारेख बंधूंच्या दोन्ही बंगल्यात सकाळपासून चौकशी सुरु