सांगली : राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षाला मारहाण केल्यामुळे भाजपचे सांगलीतील माजी खासदार संजय पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याबद्दल संजय पाटील आणि खंडू होवाळे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचवायला आलेल्या आईलाही ढकललं
कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजय पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. माजी खासदार आणि त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला आणि मुलांनाही मारहाण केली असा आरोप आहे. यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईलाही स्वतः माजी खासदारांनी ढकलून दिलं असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
रोहित पाटलांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुमन पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात तळ ठोकला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. माजी खासदार संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
पोलिसांनी गुन्हा नोंद करून घ्यावा यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आता माजी खासदार संजय पाटील आणि त्यांचे समर्थक असे एकूण पाच जणांवर कवठेमंकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वीय सहायकाला मारलं म्हणून जाब विचारला
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार पाटील यांनी म्हणाले की, गुरूवारी रात्री माझे स्वीय सहायक खंडू होवाळे यांना नगरपालिकेच्या निवडणुकीवरून मुल्ला, बाळासाहेब पाटील व पिंटू कोळेकर तिघांनी मारहाण केली. याबाबत मला माहिती मिळाली. याची विचारणा करण्यासाठी सकाळी गेलो असता अरेरावीची व ताणून मारण्याची भाषा वापरली. यावेळी माझ्या एका कार्यकर्त्यांने दोन थोबाडीत मारल्या. आम्हीही या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारावरून कवठेमहांकाळमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलीस बंबोबस्त वाढविण्यात आला आहे.
ही बातमी वाचा :