Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार हे केवळ मराठा नेते झाले आहेत, अशी स्थिती मराठा आंदोलनामुळे निर्माण झाली आहे. आजपर्यंत ते मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांची मागणी टाळत आले. मात्र, रत्नागिरीच्या सभेत त्यांनी जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. यामुळे जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा पवार हे पहिला राजकीय बळी ठरतील असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले नाही, तर ते शरद पवारांच्या इशार्‍यावर चालत होते हे स्पष्ट होते असेही त्यांनी म्हटले आहे. 


शरद पवार केवळ मराठ्यांचे नेते आहेत


मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला शरद पवार आतापर्यंत शिताफीने टाळत आले. मात्र, रत्नागिरी येथील सभेत पवारांनी जरांगेंच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यामुळे ओबीसी नेते बोलत होते त्याप्रमाणे शरद पवार केवळ मराठ्यांचे नेते आहेत, यावर शिक्कामोर्तब झालं असल्याचे ते म्हणाले. ‘‘मराठवाड्यात जरांगे आणि ओबीसी असा उघड लढा आहे. उर्वरित महाराष्ट्रात लढ्याची तीव्रता शाब्दिक नाही पण, मानसिक आहे. विधानसभा निवडणूकीनंतर ओबीसी आरक्षण जाईल असे त्यांची धारणा झाली आहे. उद्धव ठाकरे देखील ओबीसींचे आरक्षण वाढवून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अनुकुल आहेत. आता शरद पवार यांनीही जरांगेंच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. जरांगे जर निवडणूक लढणार नसतील तर, ते पवारांच्याच इशाऱ्यावर चालत आहे, असे समजू.’’ असेही त्यांनी सांगितले.  


ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण कधीच मिळणार नाही


लोकसभा निवडणूकीत दलित, मुस्लीम समाजाने संविधान वाचवण्याचा मुद्द्यावर इंडिया आघाडीला मतदान केले होते. आरक्षण हा घटनेतील महत्वाचा मुद्दा आहे. हिंदू फिलॉसॉफीनूसार तो संविधानाचा आत्मा आहे. तो काढून घेण्याचे काम इंडिया आघाडी करत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत तो समाज महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील, असे वाटत नसल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण कधीच मिळणार नाही. कारण यापूर्वी दोनवेळा हे आरक्षण कोर्टाने फेटाळले आहे. एसटी प्रवर्गातून धनगर आरक्षण मिळण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, न्यायालयानेच धनगर आणि धनगड हे दोन्ही समाज वेगवेगळे असल्याचे स्पष्ट केल्याने या मागणीत आता अर्थ उरला नाही. 


महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला 88 जागा तर उर्वरित दोनशे जागा काँग्रेस व शिवसेना यांच्या वाट्याला येतील. तिसर्‍या आघाडीबरोबर आपण जाणार नाही असे सांगत ते म्हणाले की, लोकसभेवेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना विनाअट पाठिंबा दिला होता, यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडून मदतीची आम्हाला अपेक्षा नाही.


इतर महत्वाच्या बातम्या