सांगली : जिल्ह्यातील खानापूरचे शिवसेना आमदार सुहास बाबर यांच्याकडून निसर्ग संवर्धनासाठी 'ट्री आर्मी' या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून 78 हजार झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा संकल्प करण्यात आला. दुष्काळी आणि कमी पावसाच्या भागात निसर्गाचे संतुलन राखणे आणि वृक्षारोपणाची चळवळ लोक चळवळीत बदलणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. या मोहिमेत हजारो सांगलीकरांनी सहभाग नोंदवला.
आडनिड्या ठिकाणी वाढलेलं पिंपळाचं झाड, तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी म्हणून सुरु झालेला प्रवास आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे असं आमदार सुहास बाबर यांनी सांगितलं.
माजी आमदार अनिल बाबर यांचे पुत्र आणि राजकीय वारसदार असलेल्या सुहास बाबर यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 78,178 मताधिक्याने विजय मिळवला. या मताधिक्याइतकी झाडे मतदारसंघात लावण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यामुळे 78 हजार झाडे लावण्याचा आणि त्यांचे संवर्धन करण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
सांगली जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या सहकार्याने एका एकर जागेत मियावकी पद्धतीने घनदाट जंगल विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गायरान जमिनी, रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक जागांमध्ये वड, पिंपळ, बहावा, करंज आणि चिंच यांसारख्या स्थानिक वृक्षांची लागवड केली जात आहे.
या मोहिमेत नागरिक स्वतःहून जागा, पाणी, रोपे आणि श्रमदान उपलब्ध करून देत आहेत. सुहास बाबर यांनी आपल्या मातोश्रींच्या श्राद्धदिनी 5,300 आंब्याची कलमे लावली. तसेच विटा नगरपालिकेतील एका नगरसेवकाने चार वर्षे वाढवलेली 52 झाडे भेट दिली, तर आळसंद ग्रामपंचायतीने 500 झाडांचे रोपण केले आहे.
पूर्वी सांगली जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर झाडांच्या सावलीमुळे नैसर्गिक 'ग्रीन टनेल' तयार झाले होते. रस्ते रुंदीकरणामुळे हे हरित बोगदे नष्ट झाले. आता ते पुन्हा निर्माण करण्याचे उद्दिष्ट 'ट्री आर्मी'ने ठेवले आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि प्रवाशांना सावली व थंडावा मिळावा यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त 5 जून रोजी अधिक व्यापक वृक्षारोपण मोहिम राबवण्यात येणार आहे. खानापूर-आटपाडी परिसरातील तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर राहणाऱ्या नागरिकांनीही आपल्या गावाशी नाळ जोडण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा:
