Sangli News : सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) विटा पोलिस स्टेशनमधील काही पोलिस अधिकाऱ्यांवर तक्रारदाराने गंभीर आरोप केल्याने सांगली जिल्हा पोलीस दलात (Sangli Police) खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी फिर्यादीशी संगनमत करुन तब्बल दीड किलो सोने हडपल्याचा आरोप या प्रकरणातील संशयित व्यक्तीने केला आहे. याबाबतची तक्रार देखील सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे केली आहे.
या आरोपानंतर आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे केलेल्या तक्रारीनंतर होणाऱ्या चौकशीतून नेमकं काय समोर येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा सागर जगदाळे असे या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव आहे. विटा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी खोटी तक्रार दाखल करून घेत फिर्यादीशी संगनमत करून तब्बल 1 किलो 545 ग्रॅम सोन्यावर डल्ला मारल्याची तक्रार या प्रकरणातील संशयित सागर जगदाळेनं केली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
16 फेब्रुवारी रोजी विटा पोलिस ठाण्यामध्ये सूरज मकबुल मुल्ला याने खोटी तक्रार दिली होती. त्याने आपल्या दुकानात कामास असणाऱ्या सागर लहू मंडले यास कोलकातामध्ये घेऊन जाण्यासाठी विटा येथे 100 ग्रॅम सोने दिले होते. तसेच शंकर जाधव यांचेही 455 ग्रॅम सोने त्याच्याकडे होते. मात्र तो कोलकात्यास पोहोचलाच नाही. यामुळे त्याने या सोन्याची चोरी केल्याचे म्हटले होते. तपासदरम्यान विटा पोलिसांनी सागर मंडले याचा मित्र सागर जगदाळेला ताब्यात घेत सागर मंडले सोने घेऊन फरार असल्याचे सांगितले. यावेळी सागरने सागर मंडले याने आपल्याकडे दोन किलो सोने दिल्याचे सांगितले. यापैकी 455 ग्रॅम सोने विकले असून राहिलेले 1545 ग्रॅम सोने आपल्या बहिणीकडे ठेवल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी हे सोने ताब्यात घेतले. सागर जगदाळेस चार दिवस पोलीस ठाण्यात ठेऊन अत्याचार करण्यात आला.
या प्रकरणातील मूळ फिर्यादीमध्ये केवळ 100 ग्रॅम सोने चोरीची तक्रार होती. तपासात दोन किलो सोने हस्तगत केले असताना पोलिसांनी केवळ 455 ग्रॅम सोने रेकॉर्डवर घेतले. उर्वरीत 1545 ग्रॅम सोने पोलिसांनी हडप केल्याचा आरोप सागर जगदाळे याने केला आहे. याबाबतचे पुरावेही त्याने पोलिस अधीक्षकांकडे सादर केले असून विटा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची यांची चौकशी व्हावी, त्यांच्यापासून आपल्या जीवास धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी
दरम्यान, काही सांगितलेस तर तुला गुन्ह्यात अडकवेल अशी पोलिस अधिकाऱ्यांनी धमकी दिल्याचा आरोपही त्याने केला आहे. सागर जगदाळेला 20 फेब्रुवारी रोजी विटा पोलीस ठाण्याचे अधिकारी कन्हेरे, सचिन खाडे, शशी माळी यांनी वाळेखिंडी (ता. जत) येथे नेले. तेथील एका बागेत सागरच्या हातामध्ये 100 ग्रॅम सोनेची लगड देत काही फोटो व व्हिडीओ तयार केले. तेथून विट्याकडे परतत असताना त्याला धमकावले. ‘किती सोने होते? ते कोणाला दिलेस? असे काही सांगितलेस तर तुला गुन्हात अडकवेन, अशी धमकी दिली. या भीतीमुळे आपण कोणाकडे काही वाच्यता केली नाही, असेही सागर जगदाळे याने निवेदनात म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या