Sangli News : शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर महाराष्ट्रभरातील अनेक शिवसैनिक मुंबईत जाऊन 'मातोश्री' (Matoshree) निवासस्थानी जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेत आहेत. सांगलीतील (Sangli) दोन शिवसैनिक मात्र पायी यात्रा करत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईकडे (Mumbai) निघाले आहेत. अक्षय बुरुड आणि अजय पाटील अशी या शिवसैनिकांची नावे असून सांगलीतील मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन हे दोन शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावेळी सांगलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही शिवसैनिकांना त्यांच्या पायी यात्रेस शुभेच्छा दिल्या.
अजय कलगोंडा पाटील (रा.आरग) आणि अक्षय अशोक बुरुड (रा.आरग) हे दोन शिवसैनिक सांगलीतून मुंबईकडे पायी निघाले आहेत. हे दोन शिवसैनिक सांगली इथून मुंबईकडे मातोश्रीच्या दिशेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिमा घेऊन पायी रवाना झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी हे शिवसैनिक मुंबईकडे निघाले आहेत. सांगलीच्या शिवतीर्थावरुन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं आहे.
कोणी रक्ताने पत्र लिहिलं तर कोणी रक्ताने चित्र साकारलं
दरम्यान शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांना विविध प्रकारे पाठिंबा दर्शवला जात आहे. याआधी कोल्हापूर, अंबाजोगाई, औरंगाबादमधील शिवसैनिकांनी आपल्या स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील एका शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने पोर्ट्रेट काढून त्यांना शुभेच्छा देत आपल्या नेत्याप्रती आपण किती कट्टर आहोत हे दाखवून दिलं.
उद्धव ठाकरे यांच्याकडून शपथपत्राची मागणी
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली. आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यातच आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत शिंदे गटाने पक्षावर दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेंची हा वाद सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. बंडानंतर शिवसेना दोन गटात विभागली असून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पाहायला मिळत आहेत. त्यातच आता आणखी शिवसैनिक शिंदे गटात सामील होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक सदस्याकडून शपथपत्राची मागणी केली आहे.