Sangli Crime : एक लाखांची लाच घेताना ताकारी म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आणि एक खासगी बांधकाम व्यावसायिक यांना रंगेहाथ पकडले आहे. टेंडर देण्यासाठी 4 टक्क्यांनी लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे आणि खासगी बांधकाम व्यवसायिक राहुल कणेगावकर अशी दोघांची नावे असून दोघांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलावडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीला धमकावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित बाळासाहेब होनमोरे, अभिजित हारगे, तानाजी रुईकर, उमेश मिरजे आदींच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी रुईकर आणि उमेश मिरजे अशी अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या अन्य दोन जणांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद इंद्रजित अशोक घाटे यांनी शहर पोलिसात दिली आहे. 


बाळासाहेब होनमोरे, अभिजित हारगे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून यातील बाळासाहेब होनमोरे हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक देखील आहेत. सांगलीमधील वारणाली वसाहतमधील अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह, दुरुस्तीकरिता स्वीपर देण्याच्या टेंडरची ऑर्डर देण्यासाठी चार टक्क्यांनी 1 लाखांची लाच मागितली होती. 


बाळासाहेब होनमोरे आणि अभिजित हारगे यांनी तक्रार मागे घे म्हणत होते, त्याचबरोबर तानाजी रुईकर आणि अशोक घाटे यांनी चल उठ बाहेर चल, आम्हाला तुझ्यासोबत बोलायचे आहे. बाहेर नाही आलास तर तुला बघून घेईन अशी धमकी दिल्याचे घाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिसांनी चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.