Sangli News : सांगली (Sangli) जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील औदुंबर-भिलवडी-चोपडेवाडी नदीकाठी निसर्गप्रेमींना जवळपास दहा लहान मोठ्या मगरींचा (Crocodile) अधिवास पाहायला मिळाला आहे. या मगरींचा आकार साधारण सहा फुटांपासून ते तेरा चौदा फुटांपर्यंत आहे. यंदा कृष्णा नदीची (Krishna River) पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला ब्रेक मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत 20 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान कृष्णा नदी पात्राबाहेर असल्याने पूरस्थिती असायची. अशावेळी मगरींना आजूबाजूला चरी, ओढे, वगळी शेतांमध्ये वावर पाहायला मिळायचा. यंदा मात्र पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींनी आपला अधिवास सोडलेला नाही.
कृष्णा नदीत सातत्याने कारखान्यातील सोडल्या जाणाऱ्या रासायनिक मळीच्या जलप्रदूषणामुळे लाखो मासे मृत होण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच नदीत इतर माशांचे मत्स्यबीज खाणाऱ्या खिलापीया माशांची संख्या वाढत आहे. अशावेळी नदीतील इतर मासे नष्टप्राय होण्याची भीती निर्माण झालेली आहे. मात्र या खिलापीया माशांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारी मगर ही अत्यंत महत्त्वाची जैवनियंत्रक आहे. म्हणून कृष्णा नदीमध्ये मगरीचे अस्तित्त्व अत्यंत गरजेचे आहे. तर कृष्णाकाठी ज्या ज्या ठिकाणी गावागावातील गटारगंगा नदीच्या पाण्यात मिसळते त्या त्या ठिकाणी खिलापीया मासे प्रचंड वाढले आहेत. ते खाण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षात मगरींचा पाणवठ्यावर वावर वाढला असल्याचे निसर्गप्रेमी आणि प्राणीमित्र संदीप नाझरे यांनी सांगितले.
मगरींची नदी म्हणून कृष्णा नदीची ओळख
कृष्णा नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी मगरींचा अधिवास आहे. कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच ओळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आजही दहशत आहे. याच परिसरात अनेक वेळा मगरींकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर मगरींनीही अनेक प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावकऱ्यांना तसंच किनाऱ्याला लागून असलेल्या शेतात शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन काम करावे लागतं. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी या मगरी नदी पात्राबाहेर पडत असतात. त्यामुळे आसपासच्या गावांना या मगरीपासून बचाव करावा लागतो.
मगरींचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
वनखात्याने मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांकडून केली जात आहे. नदीकाठी संरक्षक जाळी, नदीवर वीज व्यवस्था करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागाकडे करत आहे. परंतु अद्याप ही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. या मगरींमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.