सांगली : कामात वरिष्ठांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पोखर्णी येथे पुनर्वसन करण्यात आलेल्या झोळंबी वसाहतीमधील जमीन सपाटीकरण कामात गैरप्रकार केल्याचा जाधव यांच्यावर आरोप आहे. या सगळ्या कामाची तांत्रिक मान्यता न घेता परस्पर खोटे सही शिक्के वापरून व त्यावर सह्या करून सदरची अंदाजपत्रके वरिष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी सादर केल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक सुयोग औधकर यांनी केली होती. दरम्यान सचिन जाधव यांच्याच मानसिक त्रासाला कंटाळून शिराळ्यातील एका महिला वनरक्षकाने आजपासूनच कुपवाड येथील वन विभागाच्या समोर आंदोलन देखील सुरू केलेय.
शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन शंकर जाधव यांच्यावर कामात मनमानी करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. सांगलीच्या उप वनसंरक्षक नीता कट्टे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. वाळवा तालुक्यातील पोखर्णी येथे पुनर्वसन करण्यात आलेल्या झोळंबी वसाहतीमधील जमीन सपाटीकरण कामात सचिन जाधवने खोटे सही, शिक्के वापरून आणि त्यावर सह्या करून त्या जमिनीबाबतची अंदाजपत्रके वरिष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी दिली होती. संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक सुयोग औधकर यांनी सचिन जाधव यांच्या गैरकारभार विरुद्धची तक्रार केली होती. या तक्रारीवरुन वन विभागाने चौकशी केली असता वारणा कालवे विभागाच्या कार्यालयाकडून अशा कामाला कोणतीही मंजुरी देण्यात आली नसल्याचे समोर आले. यानंतर सचिन जाधव यांनी या कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सचीन जाधववर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या काळात सचिन जाधव यांना सांगली येथील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वन कर्मचाऱ्याचे वन विभागाविरोधात धरणे आंदोलन
एकीकडे सचिन जाधववर कारवाई झाली असतांना सांगलीच्या वन विभागातल्या शिराळा तालुक्यातील रेड या ठिकाणी वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रायना पाटोळे यांनी वनक्षेत्रपाल सचिन जाधव आणि सुरेश चरापले यांनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप करत आजपासून सांगलीच्या वन विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलेय.
आठ महिन्याच्या गरोदर असलेल्या या महिला वनरक्षक कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून नाहक त्रास दिल्याचा निषेधार्थ आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. रेड या ठिकाणी रायना पाटोळे या वनरक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्याच्या हद्दीत शेखरवाडी ते इंगरूळकडे जाण्यासाठी रस्ता करण्यासाठी वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या क्षेत्रांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खुदाई करण्यात आली. जवळपास साडे चारशे ब्रास उत्खनन करण्यात आले,सदर प्रकाराबाबत वन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक होतं. त्यामुळे वनरक्षक महिला कर्मचारी रायना पाटोळे यांनी यावर आक्षेप नोंदवला होता,यातून संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या विरोधात पाटोळे यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला होता. पण सदरचा गुन्हा मागे घेण्यासाठी वनविभागातल्या वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्रपाल सचिन जाधव आणि सुरेश चरापले यांनी दबाव आणला,त्याचबरोबर आपली बदनामी करण्यासाठी आणि आपल्या विरोधात ग्रामपंचायत आणि कर्मचाऱ्यांची निवेदना ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवले. ज्यामुळे आपल्याला एक महिन्यापासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. केवळ शासकीय काम योग्य पद्धतीने बजावले. यामुळे आपल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून अन्याय झाल्याचा आरोप करत रायना पाटोळे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारयां विरोधात आंदोलन सुरू केले आहे.