सांगली : पाण्यासाठी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणा दरम्यान राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांची प्रकृती खराब झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या पथकाकडून आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली आहे. रोहित पाटील यांची कालपासून तब्येत बिघडली आहे, मात्र तरीही ते उपोषणामध्ये सहभाग झाले आहेत. आज दुपारनंतर त्यांचा ताप पुन्हा वाढल्याने प्रकृती जास्त बिघडली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करत प्राथमिक औषध उपचार करण्यात आला. सध्या प्रकृती स्थिर असली, तरी आंदोलनामुळे ती आणखी बिघडू शकते, असं डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


रोहित पाटील कालपासूनच आजारी आहेत. आज त्यांचा ताप आज 102 डिग्रीवर गेला आहे. मात्र तरीही ते उपोषणावर ठाम आहेत. आम्हाला विस्तारित टेंभू योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पत्र द्यावे. त्यानंतर विस्तारित योजनेचे काम तात्काळ सुरू करावे. याबाबतची लेखी हमी द्यावी, अशी मागणी करत आमदार सुमन पाटील व रोहित पाटील यांनी आपण उपोषण करणारच, असे सांगितले होते. 


पाण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करू नका


दुसरीकडे तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील पाण्यावरून आर.आर.आबा गट आणि खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणावर खासदार संजयकाका पाटील यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. पाण्यासाठी कोणीही राजकीय स्टंटबाजी करू नये, स्टंटबाजीमुळे राजकारण कडेला जात नसतं, मुख्यमंत्र्यांनी टेंभूच्या 8 टीएमसी पाण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अतिताईपणा करू नये, असा सल्ला संजयकाका पाटील यांनी दिला आहे.  


तोपर्यंत उपोषणातून माघार नाही


दरम्यान, रोहित पाटील यांनी सर्व टीका फेटाळून लावत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसू नये. सुप्रमा मंजूर केली आहे, तर काम कधी सुरू करणार? लिखित स्वरूपात द्यावे, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, आमचं आंदोलन यशस्वी झालं आहे. आमच्या आंदोलनामुळेच भागासाठी पाणी आरक्षित करण्यात आले. आम्ही पत्र दिल्यानंतर अंतिम मान्यता मिळाली. शेतकऱ्यांचा प्रश्न असतानाही केवळ राजकारणासाठी इतकी वर्षे पूर्ण मान्यता देण्यासाठी विलंब का करण्यात आला? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की, मान्यता देऊन फक्त थांबू नये तर अंतिम मंजूरी मिळाल्याशिवाय शेतकरी अजिबात उपोषणावरून उठणार नाही, असे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या