Sangli Crime : आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असलेल्या व्हेल माशाची (Whale Fish) उलटी सांगली पोलिसांनी जप्त केली आहे. या उलटीची (Whale Vomit) किंमत तब्बल पाच कोटी 75 लाख 50 हजार रुपये आहे. सांगली (Sangli) शहरातील शामरावनगर परिसरात सापळा लावून ही कारवाई करण्यात आली असून सांगलीसह सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील दोघा संशयित तस्करांना अटक करण्यात आली आहे. सलीम गुलाब पटेल (वय 49, रा. खणभाग, सांगली) आणि अकबर याकूब शेख (51, रा. पिंगुळी, मुस्लिमवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी  याबाबतची माहिती दिली. 


सापळा रचून दोघांना बेड्या


आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिकिलो एक कोटी रुपये दराने व्हेल माशाची उलटी विकली जाते. मात्र, तिच्या विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे तिची तस्करी सुरु असते. शहरातील शामरावनगर परिसरात संशयित व्हेल माशाची उलटी घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. हा पदार्थ जप्त करत या प्रकरणी सांगलीत राहणाऱ्या सलीम पटेल त्याचबरोबर सिंधुदुर्गहून उलटी पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या अकबर शेख या दोघांना अटक करण्यात आली. सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.


पावणेसहा कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त


सांगलीतील शामरावनगरमध्ये असलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कॉलेजजवळ एक इसम आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असलेली व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघात संशयितांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ व्हेल माशाची 5 किलो वजनाची उलटी आढळून आली. तस्करी करणाऱ्या या टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल पावणे सहा कोटींच्या व्हेल माशाची उलटी पदार्थ जप्त करण्यात आली. 


दोन तस्करांविरोधात वन्यजीव अधिनियम 1972 कायद्यान्वये गुन्हा दाखल


वन विभागाने प्राथमिक तपासणी केली असता हा पदार्थ व्हेल माशाची उलटीसदृष्य (अंबरग्रिस) असल्याची पुष्टी केली. याचे वजन 5 किलो 710 ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलोचे मूल्य एक कोटी असल्याचे सांगितले. या पदार्थाची हाताळणी, खरेदी, विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित असून या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली. याशिवाय यावेळी वापरात असलेली अ‍ॅक्टिव्हा मोपेड आणि बोलोरो मोटारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दोघांविरुद्ध वन्यजीव अधिनियम 1972 कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


व्हेल माशाच्या उलटीला इतकी मागणी का?


आंतरराष्ट्रीय पातळीवर या उलटीची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असते. उंची दर्जाची आणि किमती अत्तरे, सेंट तयार करण्यासाठी या उलटीचा वापर होत  असतो. यासह इतर कारणासाठीही उलटीची तस्कारी होत असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. मात्र व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, वन्यजीव अधिनियमानुसार त्याच्या हाताळणी विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.


हेही वाचा


Kolhapur Crime : कोल्हापुरात आठवडाभरात साडे पाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; सहा महिन्यांत तिसऱ्यांदा मोठी कारवाई