सांगली : शहरातील एका व्यक्तीकडे  15 लाख रुपयांची खंडणी मागत त्यातील साडेसात लाख रुपये वसूल करत उर्वरित रकमेसाठी धमकी देणाऱ्य तिघाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. हे तिघेजण सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरत होते.एका कृषी उद्योजकाकडे त्यांनी  पंधरा लाखांची खंडणी मागत रक्कम दिली नाहीतर अट्रोसिटीचा  खोटा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी सांगलीमधील मुकुंद हणमंत जाधवर यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात (Sangli Crime News)  फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.  


प्रशांत लक्ष्मण सदामते (वय 36, रा. अंजनी, ता. तासगाव), विनोद बाळासाहेब मोरे (42, रा. खंडेराजुरी, ता. मिरज), मोनिष संजय 'लोखंडे (24, रा. हातनूर, ता. तासगाव), विठ्ठलराव विश्वासराव जाधव आणि लता विश्वासराव जाधव (दोघेही रा. पायापाचीवाडी, ता. मिरज) अशी संशयितांची नावे आहेत.यातील प्रशांत सदामते, विनोद मोरे आणि मोनिष लोखंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सांगलीमधील मुकुंद हणमंत जाधवर यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधवर यांच्या कंपनीच्या कारभाराविरोधात आंदोलनाची धमकी देत संशयितांनी खंडणी मागितली. या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारानंतर त्यांनी सर्वांविरोधात फिर्याद दिली आहे.


अॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी


या प्रकरणातील फिर्यादी विठ्ठलराव जाधवर यांची कृषी औषध उत्पादनाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये सात ते आठ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत संशयितांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी खंडणीच्या स्वरूपात 15 लाखांची मागणी जाधवर यांच्याकडे केली होती. ही रक्कम दिली नाहीतर जाधवर यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी संशयितांनी दिली होती. यानंतर जाधवर यांनी त्यांना साडेसात लाख रुपये  पाठवले होते. यानंतरही त्यांनी पुन्हा जाधवर यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावर चर्चा करण्यासाठी मिरज पंढरपूर मार्गावरील एका हॉटेलमध्ये जाधवर यांना बोलवून घेतले होते.


खंडणीचे पैसे आणण्यासाठी वापरलेल्या दोन मोटारी जप्त


 जाधवर यांच्या घरी एकाला पैसेसाठी पाठवण्यात आले. यावेळी हॉटेलवर आणि जाधवर यांच्या घरावर छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात यावेळी खंडणीचे पैसे आणण्यासाठी वापरलेल्या दोन मोटारी जप्त करण्यात आलेत. या संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सांगली  शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दोन पथके केली. सहायक निरीक्षक सुशांत पाटील, प्रफुल्ल कदम, संतोष माने, मेघराज रूपनर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


हे ही वाचा :