Sangli Crime : गावातील कुटुंबात झालेले भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या सरपंचांना 'तू कोण आम्हाला सांगणार', असे म्हणत चौघांनी दगड व कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडीमध्ये घडली. यामध्ये सरपंच महादेव काडाप्पा गुंडेवाडी जखमी झाले. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबूराव ऊर्फ पिंटू धोंडिंबा खोत, अनिल धोंडिबा खोत, खंडू धोंडिबा खोत, सुनील धोंडिबा खोत ( रा. सर्व चाबुकस्वारवाडी) या चौघांविरोधात सरपंच महादेव गुंडेवाडी यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमका प्रसंग काय घडला?


चाबुकस्वारवाडी येथील सरपंच महादेव गुंडेवाडी हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सागर काळेल यांच्यासमवेत उभे होते. दरम्यान, काळेल यांनी बाबूराव ऊर्फ पिंटू खोत यांच्यासह त्यांचे तीन भाऊ यांचा कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. त्या वादाची हकिकत सागर काळेल यांनी सांगितली. नंतर सरपंच महादेव गुंडेवाडी यांनी बाबूराव खोत व त्यांचे तीन भाऊ यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता या चौघांनी चिडून जाऊन, 'तू कोण आम्हाला सांगणार,' असे म्हणून यातील अनिल खोत यांनी सोबत आणलेला ऊस तोडणीचा कोयता महादेव गुंडेवाडी यांच्या डोक्यात उजव्या बाजूस मारला, तर बाबूराव खोतने बाजूस पडलेला दगड घेऊन डोक्यात मागील बाजूस मारून खाली पाडले. त्यानंतर सुनील खोतने हातातील लोखंडी रॉडने डाव्या पायाच्या मांडीवर मारले व खंडू खोत यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. 


पलूस पोलीस ठाण्यासमोरील अपघाताचा अखेर उलगडा 


दरम्यान, सांगली जिल्ह्यातील (Sangli News) पलूस तालुक्यातील (Palus Taluka) बांबवडेमधील विजय नाना कांबळे (वय 62) यांचा अपघाती मृत्यू नव्हे,  तर सुपारी देऊन त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. 12 एकर जमिनीच्या वादातून पलूस येथील सुनील केशवराव घोरपडे (वय 52) व अभयसिंह मोहनराव पाटील (वय 40) यांनी कांबळे यांना मारण्यासाठी तिघांना पाच लाखांची सुपारी दिली होती. पलूस तहसील कार्यालय ते कराड-तासगाव रोडकडे जाणाऱ्या पलुस पोलीस ठाण्यासमोर 20 जानेवारी रोजी वृद्ध विजय नाना कांबळे यांना पाठीमागून इनोव्हा कारची जोराची धडक देत अपघात झाल्याचा बनाव करत खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या