Sangli Crime: सांगलीमधील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता (NCP) नालसाब मुल्लाच्या हत्येचा उलगडा करण्यात सांगली पोलिसांना (Sangli Police) अवघ्या 24 तासात यश आलं आहे. या खुनातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अल्पवयीन आहे. या खुनात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. 2019 साली लागलेल्या मोक्का कारवाईतील सचिन डोंगरे या जेलमध्ये असलेल्या गुन्हेगाराला जामीन न होऊ देण्यासाठी आणि त्याला बाहेर येता येऊ नये यासाठी नालसाब मुल्ला प्रयत्न करत असल्याच्या कारणातून आणि सचिन डोंगरेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. सनी सुनील कुरणे (वय 23, रा. जयसिंगपुर ता. शिरोळ जि. कोल्हापुर), विशाल सुरेश कोळपे (वय 20, रा.लिंबेवाडी ता. कवठेमहांकाळ जि. सांगली) आणि स्वप्नील संतोष मलमे (वय 20, रा. खरशिंग ता. कवठेमहांकाळ जि. सांगली) अशी तीन आरोपीची नावे आहेत. या घटनेची फिर्याद यासिन इस्माईल नदाफ यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली होती.


पोलिसांनी 24 तासांमध्ये या गुन्ह्याचा छडा लावला असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. चौघा आरोपींनी शुक्रवारी नालसाब राहत असलेल्या ठिकाणची रेकी केली होती. तसेच मुल्लाच्या हालचालीची माहिती घेतली होती. यानंतर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास या चौघांनी मुल्लावर गोळीबार करीत कोयत्याने हल्ला चढवत पलायन केले. घटनेनंतर तातडीने पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी तपास सुरू केला. यामध्ये आज सकाळी या हल्लेखोरांना पकडण्यात यश आले. या चौघांनी नालसाब मुल्लाच्या खुनाची कबुली दिली आहे. 


सचिन डोंगरेच्या सांगण्यावरून खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या दृष्टीने पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक एलसीबी सतीश शिंदे, विश्रामबाग पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार, अमितकुमार पाटील, पोलीस कर्मचारी दीपक गायकवाड, संदीप नलवडे, विनायक सुतार, विशाल कोळी, पोलीस मुख्यालयाच्या अरुण औताडे, आम्सिध्द खोत, अमोल लोहार यानी सहभाग घेतला. 


मयत नालसाब मौलाअली मुल्ला हे त्यांच्या मालकीच्या बाबा सप्लायर्स ऑफीससमोर बसले असताना हल्लेखोरांनी दोन दुचाकी मोटरसायकलवरून येत हल्लेखोरापैकी एक दुचाकीजवळ थांबला व त्यातील 4 हल्लेखोर हे नालसाब बसलेल्या ठिकाणी आले. त्यापैकी दोन हल्लेखोरांनी त्यांच्या हातातील बंदुकीने नालसाब मुल्लाच्या अंगावर गोळ्या झाडत व दोन हल्लेखोरांनी हातातील तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच घटनास्थळी शिवीगाळ दमदाटी केली. त्याचबरोबर हवेत गोळीबार करत तलवारी हवेत फिरवत दुचाकी मोटरसायकवरून फरार झाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या