Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील वाळवामध्ये (Walwa) एका तरुणाकडून धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणाने आधी गावातीलच एका तरुणीकडे लग्नाचा तगादा लावला पण तरुणी प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर थेट बनावट कागदपत्रांद्वारे (Fake Document) तरुणीसोबत आपले विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात पाठलाग करुन विनयभंग करणे, लग्न करण्याचा तगादा लावणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह नोंदणी करुन विवाह प्रमाणपत्र मिळवणे, मुलीच्या नातेवाईकांना अडवून धमकवणे या आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच आरोपीला मदत करणाऱ्या इतर 10 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 


गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक


गावातीलच तरुणाने बनावट कागदपत्रांद्वारे विवाह प्रमाणपत्र बनवून आपली बदनामी केल्याचा आरोप वाळवामधील संबंधित तरुणीने केला आहे. विशेष म्हणजे या तरुणाने माझ्या संमतीशिवाय शाळेतून माझे बोनाफाईड प्रमाणपत्र, फोटो उपलब्ध करुन विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र बनवले असल्याचा त्या तरुणीचा आरोप आहे. हा तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तू माझ्याशी लग्न कर अन्यथा मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आरोपीने दिल्याचं तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी वाळवामधील त्या विद्यालय आणि वाळवा ग्रामपंचायतीने हलगर्जीपणा करुन अप्रत्यक्षरित्या आरोपीला मदत केल्याचे दिसून आलं आहे. यानंतर तिथल्या संबंधितावर देखील पोलिसांनी कारवाई केलेली आहे. तसेच पोलिसांनी मुलीच्या तक्रारीनुसार आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. तसंच आरोपीला मदत करणाऱ्या इतर 10 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. मुलीने आणखी काही मुद्दे पोलिसांना सांगितले असून त्या मुद्द्यावर देखील तपास करत आहोत. तसेच मुख्य आरोपीवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा केलेली आहे.


आरोपीकडून जीवाला धोका असल्याचा तरुणीचा आरोप


पण तक्रार केल्यानंतर तौसिफ शेखला अटक झाली आणि त्याला जामीनही मिळाला आहे. पण तो माझ्या घरासमोरुन अजूनही फिरतो. मला कॉलेजला जाणेही अवघड होत आहे. कधी कधी मी कॉलेजला जात नाही. कारण तौसिफ शेख आहे गुन्हेगार असून एका खुनाच्या केसमध्ये तो जेलमध्ये देखील जाऊन आला आहे. त्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका आहे असे तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. शिवाय या सगळ्या प्रकारामुळे माझं लग्न झाल्याची चुकीची बातमी कॉलेजमध्ये पसरली आणि माझी बदनामी झाली. तसंच मला लग्नासाठी येणारी स्थळे आता येत नाहीत, असा आरोप देखील तरुणीने केला आहे.


हेही वाचा


Sangli Crime: मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त