Sangli Crime : सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगावमध्ये (Tasgaon) सहा ते सात जणांनी द्राक्ष व्यापाऱ्याच्या स्कॉर्पिओ गाडीच्या आडवी गाडी लावत गाडीतील 1 कोटी 10 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग लुटल्याची घटना घडली आहे. तासगावमधील दत्तमाळ गणेश कॉलनीतील ही घटना आहे. तर द्राक्ष व्यापारी मूळचे नाशिकचे असून सध्या तासगावमधील गणेश कॉलनीत राहत आहेत. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत आरोपींना शोधण्यासाठी पथके तैनात केली आहे. महेश शितलदास केवलानी असं द्राक्ष व्यापाऱ्याचं नाव आहे. 

Continues below advertisement

कशी घडली चोरी?

तासगाव-सांगली रोडवरील तासगाव हद्दीतील गणेश कॉलनी इथे अंधाराचा फायदा घेत स्कॉर्पिओ गाडी अडवून, द्राक्ष व्यापारी आणि इतर दोघांना मारहाण करुन आरोपींनी कोट्यवधी रुपये लुटून नेले. तासगावातील गणेश कॉलनी इथल्या एका रो हाऊसमध्ये नाशिक इथले द्राक्ष व्यापारी महेश शितलदास केवलानी भाड्याने राहत आहेत. तासगाव शहरासह तालुक्यातील द्राक्ष गेल्या चार ते पाच वर्षापासून ते खरेदी करत आहेत, ही द्राक्षे ते बांगलादेश इथे पाठवतात. यावर्षीही ते द्राक्ष खरेदी करुन दरवर्षाप्रमाणे पाठवत आहेत. याच द्राक्षाचे पैसे आणण्यासाठी ते मंगळवारी (28 मार्च) स्कॉर्पिओ गाडीतून चालक आणि दिवाणजीसह सांगली इथे गेले होते. पैसे घेऊन ते गणेश कॉलनीकडे येत होते. सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान गणेश कॉलनी इथल्या मधील रोडवर ते आले असता लाईट गेल्याने अंधार असतानाच त्यांची गाडी काही अज्ञातांनी अडवली. यावेळी अज्ञातांपैकी एकाने स्कॉर्पिओ चालकास कशाचा तरी धाक दाखवून रोखले तर इतरांनी मागे बसलेल्या संबंधित द्राक्ष व्यापारी आणि दिवाणजी यांना गाडीतून खाली घेऊन मारहाण केली. याचवेळी त्या व्यापाऱ्याच्या जवळ असलेली पैशांची बॅग आपल्याकडे खेचून घेतली आणि त्यातील पैसे घेऊन यापैकी निम्मे लोक एका दिशेने आणि निम्मे लोक एका दिशेने निघून गेल्याचे बोलले जात आहे.  

आठ ते दहा जणांनी गाडी रोखल्याचा अंदाज

या घटनेनंतर द्राक्ष व्यापाऱ्याने गणेश कॉलनी इथल्या काही लोकांच्या उपस्थितीत द्राक्ष व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सर्व हकीकत सांगितल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुखांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला. आठ ते दहा जणांनी द्राक्ष व्यापाऱ्याची स्कॉर्पिओ गाडी रोखल्याचं कळतं. तसंच द्राक्ष व्यापाऱ्याजवळील एक कोटी दहा लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याच्या घटनेची सध्या चर्चा होत आहे. मात्र या घटनेने तासगाव शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली होती. 

Continues below advertisement