Sangli Crime : सांगली शहरामध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. भर रहदारीच्या ठिकाणी थरारक पद्धतीने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. केवळ एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून एका तरुणाचा तीन तरुणांनी खून केला. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही खळबळजनक घटना घडली. राजवर्धन राम पाटील (वय 18) असे या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो वसंतदादा औद्योगिक परिसरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तपास सुरू केला आहे. 


मयत राजवर्धन पाटील हा तरुण आणि हल्लेखोर तरुणांमध्ये एकमेकांकडे बघण्याच्या रागातून काही दिवसांपासून वाद सुरू होता. कालही (13 एप्रिल)  सायंकाळी सहाच्या सुमारास वसंतदादा साखर कारखान्याच्या गेटसमोर राजवर्धन पाटील हा पळत होता आणि त्याच्या मागे तीन ते चार तरुण हातामध्ये चाकू आणि कोयता घेऊन पाठलाग करत होते. कारखाना गेटच्या हद्दीत या हल्लेखोरांनी राजवर्धनला गाठून त्याच्यावर कोयता आणि चाकूने वार करत त्याचा निर्घृण खून केला.


राजवर्धन वसंतदादा औद्योगिक परिसरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. तो मूळचा तासगाव तालुक्यातील मतकुणकी या गावचा असून सध्या तो बुधगाव या ठिकाणी राहत होता. सायंकाळी वसंतदादा कारखाना परिसरात आला असता हल्लेखार तरुण व राजवर्धन यांच्यामध्ये वादावादी घडली आणि त्यानंतर थरारक पाठलाग करत खून करण्यात आल्याचा प्रकार घडला. या खुनाच्या घटनेने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.


खुनाच्या घटनांमागे नशेखोरी?


सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये नशेखोरीचे प्रमाण देखील मोठे आहे आणि नशेखोरीतूनच खुनाच्या घटनाही वाढत आहेत . काही टोळके नशा करत असल्याचे देखील वारंवार समोर येत आहे. यामुळे किरकोळ कारणांमधून हत्या घडण्यामागे नशेखोरी हे देखील प्रमुख कारण असताना देखील नशेखोरीला आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. 


आठवड्यात दुसरा खून


शहरात पाच दिवसांपूर्वी वानलेसवाडी येथे एक गुंठ्यांच्या जागेवरून महिलेचा निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना साखर कारखाना परिसरात दिवसाढवळ्या महाविद्यालयीन तरुणाचा खून झाला आहे. आठवड्यात खुनाची दुसरी घटना  घडल्याने खळबळ उडाली आहे. 


शस्त्रे येतात कुठून?


विशीतील तरुणांच्या हातात चाकू, सुरे, कोयते, तलवारींसह घातक शस्त्रे दिसून येत आहेत. किरकोळ कारणातून शस्त्रे बाहेर काढत हल्ले चढवले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ही शस्त्रे तरुणाईच्या हातात येतात कोठून, त्यांना पुरवणारे कोण आहेत, मिळतात कोठे, याचा शोध घेत त्याबाबातर पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची गरज आहे.


इतर महत्वाच्या बातम्या