सांगली : पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून 83 लाखाची फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या चौघांना दहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सांगली शहरातील रिचआधार मल्टी ट्रेडर्स ॲड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्यास विशिष्ट कालावधीनंतर रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवले गेले. सांगलीसह सोलापूर येथील सहा गुंतवणूकदारांची तब्बल 83 लाख 48 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिचआधार कंपनीचा संचालक सतीश काका बंडगर, जयश्री सतीश बंडगर, संतोष काका बंडगर आणि अनिल मारुती आलदर (रा. सांगली ) यांचा समावेश आहे. या चौघांनी शहरात रिचआधार मल्टी ट्रेडर्स ॲड डेव्हलपर्स एल. एल. पी. नावाची कंपनी स्थापन केली होती.
कंपनीत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्याला बळी पडून तक्रारदाराने कंपनीत गुंतवणूक केली. परंतु दिलेल्या मुदतीत कोणताच परतावा न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही कंपनीतील चौघा संशयितांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदाराने सांगली शहर पोलीस ठाण्यात संशयीत चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.
कंपनीत गुंतवणूक केलेल्या संतोष नांमदेव सुरवसे (रा. जवळा ता. सांगोला, जि. सोलापूर ) यांची 23 लाख 50 हजार, प्रविण दिपक कचरे (रा. श्रीपुर ता. माळशिरस जि. सोलापूर) यांची 11 लाख 26 हजार, संगिता चंद्रकांत नलवडे (रा. आमणापुर ता. पलुस जि. सांगली) यांची 11 लाख 10 हजार, सागर गिरी गोसावी (रा. अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर) यांची 3 लाख 5 हजार, अनिल एकनाथ सुर्यवंशी (रा. लंगरपेठ ता. कवठेमहांकाळ) यांची 8 लाख 57 हजार 500 रुपये अशी एकूण सहा ठेवीदारांची 83 लाख 48 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. आर्थिक फसवणुकीची व्याप्ती अधिक असल्याने सदर गुन्हा पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या निर्देशाने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
मालाडमध्ये बोगस पतपेढी तयार करून करोडोंची फसवणूक
मालाडमध्ये बोगस सहकारी पतपेढी काढून छोटे छोटे व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना गुंतवणुकीतून 6 वर्षात दाम दुप्पट रक्कम परत देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बोगस पतपेढी संस्था चालकास (Bogus Credit Bank) अटक करण्यात आली आहे. साधारणपणे चार हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. रामसिंग चौधरी (39) असे अटक करण्यात आलेल्या पतसंस्था संचालकाचे नाव आहे.