Sangli Atpadi Farmer : आटपाडीच्या आठवडी बाजारात आलिशान इंडिव्हर गाडीतून (Endeavour Car) शेतकऱ्याने मेथीच्या भाजीची विक्री केली. लिलावात दर न मिळाल्याने शेतकऱ्याने थेट ग्राहकाला मेथीची भाजी विकली. या विक्रीतून शेतकऱ्याला तीन पट दर मिळाला. आटपाडीमध्ये आठवडी बाजारामध्ये एका शेतकऱ्याने चक्क आपल्या आलिशान इंडिव्हर गाडीतून मेथीची भाजी विक्री केली. झरे येथील वामन गोरड असे या तरुण शेतकऱ्याचं नाव असून त्याने आपल्या आलिशान गाडीतूनच भाजी विक्रीचा निर्णय घेतला. वामन यांनी स्वतः थेट ग्राहकाला भाजी विक्री केल्याने यामधून त्यांना प्रत्येक पेंडी मागे लिलावापेक्षा तीन ते चार पट दर अधिक मिळाला. यामुळे शेतकऱ्याचा चांगला नफा झाला आहे. अनेकदा शेतकऱ्यांना त्यांच्या माला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सापडतात आणि हताश होतात, पण या तरुण शेतकऱ्याने या संकटावर मात केली आहे.
आपल्या शेतामध्ये लावलेली मेथीची भाजी लिलावामध्ये नेण्यासाठी वाहन भाडे करून जाणे आणि लिलावात मिळणारा दर याला एका शेतकऱ्याने पर्याय शोधला आहे. आपल्या स्वत:च्या मालकीच्या आलिशान इंडिव्हर गाडीतूनच मेथीची भाजी शेतकऱ्याने आटपाडीमध्ये शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये आणली. शेतकऱ्याने आटपाडी नगरपंचायत समोर आपली गाडी उभा करून मोठ्याने ओरडून थेट ग्राहकांना भाजी विक्री केली. यातून त्यांना चांगला नफा कमावला आहे.
शेती करत असताना शेतकऱ्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. पीक घेत असताना असणारे हवामान, मजूर, लहरी निसर्ग याचबरोबर हवामान बदलाच्या परिणामाने पिकावर आलेले अनेक रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. यातून ही पीक व्यवस्थित आलं तर सर्वात मोठा धक्का शेतकऱ्याला काबाडकष्ट करून पिकवलेला माल बाजार पेठेत विक्रीला नेल्यानंतर त्याच्या मालाला आलेला भाव पाहून येतो. उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. पण या शेतकऱ्याने याला पर्याय शोधत थेट आपल्या गाडीतून भाजी विक्री केली.
या तरुण शेतकऱ्याने नामी शक्कल लढवत आलिशान गाडीतून स्वतः मेथीची भाजी विक्री केली. शेती परवडत नाही म्हणून अनेक शेतकरी आपल्या नशिबाला दोष देत बसतात, पण आपण पिकवलेला माल आपण स्वतः जर विकला तर त्याला हमखास दर मिळतोच. मात्र माल विकत असताना लाज न बाळगता माल विकाल्यास तिप्पट दर मिळत असल्याचा प्रत्ययही यानिमित्ताने शेतकरी वामन पांडुरंग गोरड यांना आला आहे. वामन यांनी स्वतः विक्री केल्याने त्यांना या भाजी विक्रीतून प्रत्येक पेंडीमागे लिलावापेक्षा तीन ते चार पट दर भेटला आहे.