सांगली : सांगलीतील दुष्काळी भागासाठी पाणी आणण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल तर तो गोपीचंद पडळकर यांनी. देवेंद्र फडणवीस त्यांना मंत्री करतील असा विश्वास भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे असंही ते म्हणाले. फडणवीसांनी पडळकरांना मंत्री करावा आणि आपल्याला राज्यपाल करावं असंही ते गमतीने म्हणाले. सांगली जिल्ह्यातील विट्यामधील कार्यक्रमात सदाभाऊ खोत बोलत होते.
जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाल्याबद्दल आणि खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खेचून आणलेबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा विटा येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार आणि भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.
पडळकर मंगळसूत्राचं रक्षण करणारे
सदाभाऊ खोत म्हणाले की, खानापूर, आटपाडी, जतसारख्या दुष्काळी भागामध्ये पाणी जर कुणी आणलं असेल तर ते गोपीचंद पडळकरांनी. योद्धा रणांगणात हारत नसेल तर त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. काही फुटकी लोक सोशल मीडियामध्ये त्यांना बदनाम करतात. कुठे भांडणामध्ये मंगळसूत्र तुटलं तर गोपीचंद पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणतात. अरे, गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे.
मला राज्यपाल करा, सदाभाऊंची मागणी
सदाभाऊ खोत म्हणाले की, पृथ्वीराज देशमुख म्हणाले की गोपीचंद पडळकर हे तरुण असल्याने मंत्री झाले नाहीत. मग मी तर म्हातारा होतो ना? मला तरी मंत्री करायला पाहिजे होतं. पुढेही आमचीच सत्ता असणार आहे. पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील, खासदार होतील. गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील. पण मला कुठं तरी राज्यपाल तरी करा. नाही तर आमचं बॅड वाल्यासारखं व्हायचं. बॅडवाल्याचं कसं असतं चांगलं गाणं वाजवायला लागलं की शेजारी असणारे सर्व म्हणतात की पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. तशी आमची अवस्था झाली आहे.
जयंत पाटलांचे अजून तळ्यात-मळ्यात, पडळकरांचा टोला
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचे अजून तळ्यात मळ्यात सुरु असल्याचे म्हटलं आहे. त्यांचे कुठे जायचे ते तरी अजून नक्की नाही. मात्र आपल्या सगळ्याच्या विरोधात ताकदीने लढायचे हा जयंत पाटील यांचा अजेंडा पक्का आहे. आता गट, पक्ष, विचार नाही असे म्हणत पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांनी डिवचले. दुसरीकडे भाजपा शिवाय देशाला, सांगलीला पर्याय नाही. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवू असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला.
ही बातमी वाचा: