सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) ऊस दराचा (Sugarcane) तिढा अजून सुटलेला नाही. ऊस दराच्या तिढ्यावरुन शेतकरी नेते राजू शेट्टी विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण राजाराम बापू कारखान्यासमोर आंदोलन केले म्हणून कारखाना प्रशासनाच्या तक्रारीनंतर राजू शेट्टी यांच्यासह 150 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे, राजू शेट्टी यांनी जयंत पाटलांची तिरकी चाल असे म्हणत गंभीर आरोप जयंत पाटील यांच्यावर करायला सुरुवात केली आहे. यामुळे या ऊस दराच्या आंदोलनातून राजू शेट्टी विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर देखील परिणाम करणारी असू शकतील, अशी चर्चा आहे. 


राजू शेट्टी यांनी फेसबुकवर पोस्ट करून जयंत पाटलांवर तोफ डागली आहे. 


जयंत पाटलांची तिरकी चाल ………


सांगली जिल्ह्यातील ऊस दराच आंदोलनाची धग अजून पेटलेलीच आहे. जिल्ह्यातील 16 कारखान्यांनी आपला गळीत हंगाम सुरू केलेले आहेत. यामधील 4 कारखाने जयंत पाटील यांचे स्वत:चे मोहनराव शिंदे व विश्वासराव नाईक चिखली व क्रांती कुंडल हे जयंत पाटलांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सहकारी मित्रांचे, 4 कारखाने विश्वजीत कदम यांचे म्हणजे जवळपास 16 पैकी 11 कारखाने हे जयंत पाटील व विश्वजीत कदम यांच्याकडे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी दराचा तोडगा काढावा या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवले आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्रित होवून यंदाच्या वर्षीची पहिली उचल 3100 रूपये ठरविले आहेत. यामध्ये सहा कारखान्यांची पहिली उचल एफ. आर. पी प्रमाणे 3200 पेक्षा जास्त जाते. पाच कारखान्यांची उचल एफ. आर. पी प्रमाणे 2450 ते 2700 रूपयापर्यंत आहे. मग जे पाच कारखाने 2450 पासून 2700 पर्यंत दर देतात त्या कारखान्यांना 3100 रूपये प्रतिटन म्हणजेच 400 पासून ते 650 रूपये प्रतिटन जादा दर देण्यास परवडते मग बाकीच्या 11 कारखान्यांना एफ. आर. पी पेक्षा 100 रूपये देण्यास का परवडत नाही. याचाच अर्थ एफ. आर. पी पेक्षा कमी दर देवून जयंत पाटील, विश्वजीत कदम, अरूण लाड, मानसिंगराव नाईक यांच्या कारखान्यात शेतकऱ्याना नागवलं जात आहे. 


ज्या राजारामबापू , सोनहिरा, क्रांती कुंडल या कारखान्याची रिकव्हरी चांगली असून या भागातील शेतकऱ्यांनी 16 महिन्याचा आपला ऊस गाळपास पाठविलेला आहे. यामुळे या ऊसाची रिकव्हरी म्हणजेच साखर उतारा चांगला मिळाला आहे. यामागे कारखाना प्रशासनाचे किंवा चेअरमानांचे कोणतेच योगदान नसून शेतक-यांचे योगदान आहे. मग राजारामबापू कारखाना साखराळे, वाटेगांव, कारंदवाडी युनिट, सोनहिरा साखर कारखाना, क्रांती कारखाना कुंडल, वसंतदादा साखर कारखाना सांगली ,विश्वासराव नाईक कारखाना चिखली, दालमिया शुगर निनाई  हे कारखाने साखळी करून दर कमी देवू लागले आहेत. सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे प्रतिटन 200 रूपयाचे नुकसान होवू लागले आहे. मग शेतकऱ्यांनो तुम्हीच विचार करा जर तुमचा 100 टन ऊस गेला असेल तर 20 हजार रूपयाचे तुमचे नुकसान होणार आहे. आणि आता कारखान्याचे मार्गदर्शक जयंत पाटील साहेब राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून परिपत्रक काढून आम्हाला शेतकऱ्यांना 3100 रूपये दर मान्य आहे असे लिहून घेऊन एफ. आर पी पेक्षा कमी दर देवू लागले आहेत. त्यांच्याच कारखान्याच्या ताळेबंदानुसार वाढलेल्या साखर दरातील फरकानुसार कारखान्याकडून शेतकऱ्यांना 260 रूपये प्रतिटन देणे लागते. यापैकी राजारामबापू कारखाना शेतक-यांना 50 रूपये देणे लागतो. मग उर्वरीत 210 रूपये कुणाच्या खिशात गेले आहेत याचा शोध घ्यावा लागणार आहे. 


आज राजारामबापू कारखान्याने जबरदस्तीने कारखाना, बँक, पाणीपुरवठा संस्था, शाळा महाविद्यालयाचा स्टाफ यांचेकडून व कामगाराकडून जबरदस्तीने एफ. आर. पी मध्ये तुकडे करण्याचे अधिकारपत्र लिहून घेत आहेत. यामधून कोट्यावधी रूपयाचे नुकसान ऊस उत्पादक शेतक-यांचे होणार आहे. कारखान्याच्या काट्यावर आंदोलन झाल्यावर लाखो रूपयाचे नुकसानीचे राजू शेट्टी यांच्यासहित कार्यकर्त्यांवर कारखान्याच्या सचिवांमार्फत गुन्हे दाखल करून तुमच्या पाताळयंत्री स्वभावास समाधान मिळणार असेल तर आम्ही जामीनसुध्दा घेत नाही तुमचं समाधान होईपर्यंत तुरूंगात राहतो पण शेतकऱ्यांचे पैसे तेवढ बुडवू नका. 


इतर महत्वाच्या बातम्या