Raju Shetti on Organic Farming : पूर्णतः सेंद्रीय शेतीकडे जाणे हा वेडेपणा ठरेल, सेंद्रीय शेतीच्या नावाखाली प्रचंड बुवाबाजी, फसवणूक चालू असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. पूर्णतः सेंद्रीय शेतीकडे जाणे हा वेडेपणा ठरेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. ते सांगलीत अग्रणी शिवार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
सगळ्या जगानं सेंद्रीय शेती करावी या मताचा मी नाही
राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सेंद्रीय शेती वाढली, तर जगामध्ये अन्नधान्याचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. सगळ्या जगानं सेंद्रीय शेती करावी (Raju Shetti on Organic farming) या मताचा मी नाही. कारण देश स्वतंत्र झाला, त्यावेळी देश सेंद्रीय शेती करत होता. रासायनिक खते, कीटकनाशके माहीत नव्हते. त्यावेळी लोकसंख्या 35-40 कोटींच्या आसपास असताना बाहेरच्या देशातून भीक मागून या देशातील जनतेला अन्नधान्य खायला आणावे लागत होते. आज 40 कोटींची लोकसंख्या 140 कोटींवर गेली तरी रासायनिक खतांच्या वापरामुळे पुरेसं अन्नधान्य आज मिळत आहे. एक वर्ग पोटाची आग विझविण्यासाठी खात असून दुसरा वर्ग आरोग्यासाठी, चवीसाठी खातो. सेंद्रीय शेतीचे शंभर टक्के मी समर्थन करत नाही, असेही त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी लोकसभेच्या रिंगणात
दरम्यान, आगामी लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रणशिंग फुंकण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. हातकणंगले सोडून या कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार? त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबीराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या निवडणुकीची माहिती दिली. राजू शेट्टी यावेळी म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत. भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :