Swabhimani Shetkari Saghtana : गेल्या 10 तासापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखाना समोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. खुद्द माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) याठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा प्रशासनाकडून 16 डिसेंबर रोजी कारखानदार आणि स्वाभिमानीचे बैठक लावण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र दत्त इंडिया कारखान्याकडून एफआरपी जाहीर झाल्याशिवाय कारखान्यासमोरुन उठणार नसल्याचा निर्धार राजू शेट्टींनी केलाय. तसेच माजी मंत्री जयंत पाटील आणि विश्वजीत कदम हे झारीतले शुक्राचार्य असल्याचे राजू शेट्टींनी म्हटलंय. 


राजू शेट्टी आंदोलनावर ठाम


दत्त इंडिया साखर कारखान्यावर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखानदारांचा दर जाहीर न करण्याबाबत दबाव असल्याचे राजू शेट्टींनी म्हटलंय. सांगलीतील दत्त इंडिया कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  सुरु असलेले ठिय्या आंदोलन गेल्या 10 तासापासून सुरूच आहे. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 100 आणि एफआरपी अधिक 100 रुपये दत्त इंडिया कारखान्याने जाहीर करावे, तेव्हाच या कारखान्या समोरचे आंदोलन मागे घेऊ यावर राजू शेट्टी ठाम आहेत. 


जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली सर्व साखर कारखान्याच्या अध्यक्षांची बैठक


दत्त इंडियाला अन्य कारखानादार नेते हा निर्णय घेऊन देत नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी 16 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याच्या अध्यक्षांची बैठक आयोजित केली आहे. कारखानादारांच्या अध्यक्षांच्या बैठकीचे पत्र मिरज प्राताधिकारी यांनी राजू शेट्टींना दिले आहे. राजू शेट्टींनी 16 डिसेंबरच्या तारखेला बैठकीस येतो, मात्र  दत्त इंडिया कारखान्याने मागील वर्षी देणारे पैसे देण्याचा निर्णय  जाहीर करावा या मागणीवर राजू शेट्टी ठाम आहेत. 


कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊसाला दर द्यावा


सांगलीचे जिल्हाधिकारी कारखानादाराची बाजू घेत आहेत. यापुढे आम्ही आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ऊस दराच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी देखील ऊसाला दर द्यावी अशी भूमिका राजू शेट्टींनी मांडली आहे. ऊस दरासाठी राजू शेट्टींनी वसंतदादा साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. त्यावेळी ते बोत होते. 


जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर टीका


सांगलीमध्ये ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यासमोर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. कारखान्यांमध्ये घुसण्याचा देखील स्वामिनीच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळं आता कारखान्याच्या गेटसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. स्वतः राजू शेट्टी या ठिकाणी कारखान्याच्या गेटसमोर ठाण मांडून बसले आहेत. जोपर्यंत ऊस दराचा निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखान्यासमोरुन उठणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टींनी घेतली आहे. तसेच जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामुळे शेतकऱ्यांना दर मिळत नाही, असा आरोप शेट्टींनी केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


'या' दोन आमदारामुळं सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटेना, राजू शेट्टींचा प्रहार; ऊस दरासाठी वसंतदादा कारखान्यासमोर ठिय्या