सांगली : हा देश तुम्ही हिंदुराष्ट्र करायला निघाला, तुम्ही असं दाखवलं की आम्ही मुसलमान, ख्रिश्चनांच्या विरोधात आहे, पण या देशांमध्ये ख्रिश्चन आणि मुसलमान सुद्धा गेला नाही. मात्र, वसुलीमुळे 17 लाख हिंदू कुटुंब देशाबाहेर गेली, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. सांगलीमध्ये काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली. या सभेतून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपला रोखण्यासाठी विशाल पाटील यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. 


देशातून माणसं बाहेर काढण्यासाठी आपल्याला सत्ता दिली का? 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सोडून गेलेली कुटुंब वसुलीचे राज्य म्हणत होते. ते म्हणत होते की आम्ही जर भारतामध्ये राहिलो आणि यांना वसुली दिली नाही तर आमच्या बापजाद्यांनी कमावलेलं आहे ते या मातीमध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून इज्जत राहण्यासाठी देश सोडून जात आहेत. मागील दहा वर्ष जे आपण भाजपला सत्ता दिली. मात्र, या देशातून माणसं बाहेर काढण्यासाठी आपल्याला सत्ता दिली का? भाजप कार्यकर्त्यांना आणि आरएसएसवाल्यांना विचारतो की तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणता मोदींना पुन्हा पाच वर्षे द्या? तुम्हाला लाज वाटत नाही का? या देशातील नागरिक की जो हिंदू आहे तो स्वतःची असणारी इज्जत राखण्यासाठी नागरिकत्व सोडावं लागत आहे. 


राज्य कल्याणकारी न राहता वसुली राज्य झालं 


ते पुढे म्हणाले की, मोदींना पाच वर्षे आम्हाला द्या, कशासाठी द्या? माझं उत्तर जर खोटं असेल तर माझं आव्हान आहे. संघाने कधीही सांगावे कोणत्या प्लॅटफॉर्मवर यायचं, मी चर्चेसाठी तयार आहे. जे उत्तर राज्यसभेमध्ये दिलं ते मी दाखवायला तयार आहे. ही आकडेवारी माझी नाही, तर ही सरकारची आकडेवारी आहे. राज्य कल्याणकारी पाहिजे, पण इथलं राज्य कल्याणकारी न राहता वसुली राज्य झालं अशी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, आणि पुन्हा पाच वर्षे यांना देणार असाल तर दहा वर्षांमध्ये 17 लाख गेली पुन्हा पाच वर्षांमध्ये 50 लाख तर कुटुंब निघून गेले तर त्याचं आश्चर्य मानू नका. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये हे कर्ज मानसी 26 रुपयांवरून 84 रुपयांवरती गेलं आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार यांनी आणि गफलत केली, तर  2026 मध्ये हे कर्ज 96 रुपये होईल, अशी परिस्थिती आहे. चार रुपयांमध्ये हा देश चालू शकतो का? अशी विचारणा त्यांनी केली. मोदींनी कारखाने विकले आहेत, भारतीय रेल्वे 100 टक्के सरकारी होती आज हळूहळू 70 टक्के विकली आहे. मीडिया या गोष्टी बाहेर काढत नाही, अशी परिस्थिती आहे. मोदी देशाला कंगाल केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.  


इतर महत्वाच्या बातम्या