Sangli Crime : सांगली जिल्ह्यात एटीएमवर दरोडा टाकण्याची मालिका सुरुच आहे. आता जत तालुक्यातील  डफळापूर येथे दोन दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर दरोड्याचा प्रयत्न झाला. धक्कादायक बाब म्हणजे या एटीएम फोडीचा सूत्रधार पोलीस हवालदार असल्याची  माहिती आता पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. 


जत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून यातील मुख्य सूत्रधार हा कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील सचिन यशवंत कोळेकर या कर्मचाऱ्यासह सुहास मीरासाहेब शिवशरण  या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर फोडून दरोड्याचा प्रयत्न झाला होता. एटीएम मशीन ओढून बाहेर काढण्यात आले होते. 


ते पळवून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांचा होता. मात्र अवजड मशीन उचलता न आल्याने ते रस्त्यावरच टाकून चोरट्यांनी पलायन केले. दोन दिवसांपासून जत पोलिसांनी अत्यंत शिताफीने यंत्रणा राबवत तपासाला गती दिली. सोमवारी या प्रकरणाचा छडा लागला.तपासामध्ये कवठेमहाकाळ पोलिसात कार्यरत असलेला व मूळचा जत तालुक्यातील रामपूर येथील सचिन यशवंत कोळेकर हाच या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 


कोळेकर व त्याचा साथीदार सुहास शिवशरण या दोघांना जत पोलिसांनी अटक केली.गाडी भाड्याने घेऊन तसेच रेकी करून, एटीएम चोरीचे मोडस ऑपरेंडी डोळ्यांसमोर ठेऊन सदरचा चोरीचा प्रकार कोळेकरने केला. मात्र,एटीएम जड असल्याने ते तेथेच टाकून पळून गेला.सांगली जिल्ह्यात या आठ  महिन्यांत चौथ्यांदा एटीएम मशीन फोडण्याची ही घटना घडली आहे. या दोघांना ही न्यायालयापुढे उभे केले असता पोलिस कोठडी सुनावली आहे.  


यापूर्वी जेसीबीने फोडले होते एटीएम; तर गोळीबार करून एटीएम मधील रक्कम होती चोरली


चक्क जेसीबीने एटीएम  फोडल्याची घटना मिरज तालुक्यातील आरग गावात काही महिन्यांपूर्वी घडली होती. ॲक्सिस बँकेचे हे एटीएम असून या एटीएमजवळ सुरक्षा रक्षकाचा नसल्याने एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पाहून चोरट्यांनी जेसीबीने एटीएम फोडल्याचे धाडस दाखवलं होतं.फोडलेल्या एटीएममध्ये 27 लाखांची रोख रक्कम रोकड होती. जरी जेसीबीने चोरट्यांनी एटीएम फोडलं असलं तरी यातील 27 लाखाची रक्कम काही चोरट्यांच्या हाती लागली नव्हती. 


फोडाफोडीचा आवाज येऊ लागल्याने लोक जागे होऊ लागले आणि याची कुणकुण चोराना लागल्याने चोरटे रक्कम न घेताच पसार झाले होते. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे काही महिन्यांपूर्वी मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान चोरट्यांनी गोळीबार करत बॅंक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन पळवल्याची घटना घडली होती. कटरच्या सहाय्याने  मशीन तोडत होते. त्यावेळी झालेल्या आवाजाने शेजारी राहणारा एक वृद्ध जागा झाला. त्याने आरडाओरडा करताच चोरट्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर सहा चोरट्यांनी एटीएम पळवून नेले होते.या दोन्ही गुन्ह्यातील आरोपीचा शोध अद्याप लागलेला नाही.