सांगली: टेंभू पाणी योजनेच्या विस्तारीकरणासंबंधित राज्य सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील (Rohit Patil) यांनी आमरण उपोषण स्थगित केलं आहे. आश्वासनाप्रमाणे जर एक महिन्यात काम सुरू नाही झालं तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. जेष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या हस्ते सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी उपोषण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर आणि सांगलीचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते. 


तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील वंचित गावाच्या पाण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसंबंधित मागण्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन दिलं. उपोषण स्थगित करताना सरकारचं आश्वासन पत्र रोहित यांनी वाचून दाखवलं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करत असल्याचा निर्णय आमदार सुमनताई पाटलांनी जाहीर केला. 


रोहित पाटील यांना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फोन


टेंभू योजनेच्या विस्तारीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील आणि युवानेते रोहित पाटील हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता. त्यावेळी स्टेजवरच रोहित पाटलांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. त्यावेळी तासगावामधील गावांना पाण्यासाठी एका महिन्यात प्रशासकीय मान्यता देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं.


भाजपच्या नेत्याचा पाठिंबा तर खासदाराचा विरोध


भाजपाचे  नेते आणि सांगली भाजपचे  माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सुमनताई आणि रोहित पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता. उपोषणस्थळी पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला बोता. एका बाजूला भाजपाचे खासदार उपोषणाला विरोध करत होते आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्याच खासदारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जाहीर पाठिंबा देत असल्याने राजकीय चर्चेला उधान आले होते.


सांगलीमध्ये आर.आर. आबा गट विरुद्ध भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पाण्यावरून संघर्ष पेटला आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांच्या उपोषणावर सातत्याने टीका करण्यात येत होती. तर दुसऱ्या बाजूला मात्र भाजपाचे  नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष सुमनताई आणि रोहित पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता. 


ही बातमी वाचा: