सांगली : दोन जण लग्नास उत्सुक असतील आणि भटजी अडथळा करत असेल तर पळून जाऊन दोघांनी लग्न करणे हा पर्याय असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar)  लगावलाय. ठाकरे आणि आमचा साखरपुडा झाला आहे, मात्र लग्नाच्या मुहूर्तासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीरूपी दोन भटजी अडथळे आणत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यावर आज जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. 


जयंत पाटील यांनी आज सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली. त्यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लग्नासाठी दोघेही उत्सुक असतील आणि भटजी अडथळा आणत असतील तर पळून जाऊन लग्न करावं. 


जयंत पाटील पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांचे राष्ट्रवादीला आणि इंडिया आघाडीला काही वावडं नाही. पण आघाडीत यायचं असेल तर काही नियम पाळली पाहिजेत.


टेंभू पाणी योजनेच्या विस्तारीकरणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील आंदोलन करत आहेत. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आबांच्या कुटुंबाच्या आंदोलनाकडे सरकारने अद्याप हवा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने पाऊले टाकून सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी द्यावी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावा. 


घोडंमैदान लांब नाही


राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार यांनी दावा केला असून ते निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडणार आहेत. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी कोणाची यावर येत्या 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे घोडंमैदान लांब नाही. भारतात राष्ट्रवादी काँग्रेसचे 23 राज्यात अस्तित्व आहे. त्यापैकी 19 राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. पक्ष आमदारांचा नसतो, कार्यकर्त्यांचा असतो. कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आहे.


शरद पवार हे भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा केल्या जातात, त्यावर विचारल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीत येणार आहेत असे सांगितलं तर शंका निर्माण होऊ शकते का?  असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी विचारला. 


ही बातमी वाचा: