सांगली: पत्नी सासरी गेल्यानंतर परत येत नसल्यास नवरे अनेक फंडे वापरतात, कुणी तिला गिफ्ट देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न करतो तर कुणी आणखी काय करतं. पण सांगलीत अशी घटना घडलीय की जिची चर्चा सर्वत्र सुरू झालीय. पत्नी नांदायला येईना म्हणून सटकलेल्या पतीने थेट पोलीस ठाण्यासमोरच्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. यामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाली. चांदसाब चिवनगी असं या नव पतीचे नाव आहे.

Continues below advertisement


सांगलीच्या जत शहरामध्ये ही घटना घडली असून एका पतीने मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्याची बातमी व्हायरल झाली. पत्नी नांदायला येत नाही आणि पोलीसही दखल घेत नाही म्हणून या नवऱ्याने थेट पोलीस ठाण्यासमोरच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. 


चांदसाब चिवनगी हा मूळचा कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातल्या आहे .त्याचा विवाह जत तालुक्यातल्या गिरगाव इथल्या मुलीशी झाला असून त्यांला चार अपत्य देखील आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याची पत्नी माहेरी निघून गेली आहे. वारंवार विनंती करून देखील सासरचे लोक पत्नीला पाठवत नसल्याने चांदसाब यांने जत पोलीस ठाण्यामध्ये देखील धाव घेतली होती. मात्र त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर आज सकाळी थेट जत पोलीस ठाण्यासमोर असणाऱ्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं.


सुमारे तासभर चांदसाब हा मोबाईल टॉवरवर बसून होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी आंदोलक पतीच्या पत्नीला बोलावून घेऊन तडजोड करण्याचं आश्वासन दिल्यानंतर चांदसाब खाली उतरला. त्यामुळे सुमारे तासभर सुरू असलेला हा सिनेस्टाईल गोंधळ थांबला.