Sudan Crisis : सुदानमध्ये अंतर्गत युद्ध सुरू असून सांगली जिल्ह्यातील जवळपास 100 हून अधिक नागरिक त्या ठिकाणी अडकले आहेत. सुदानमध्ये गेल्या 12 दिवसांपासून युद्ध सुरू असल्याने हे भारतीय नागरिक (Indians) भीतीच्या छायेत आहेत. सुदान देशातील केनाना शुगर कंपनीत हे लोक कार्यरत आहेत. भारतीय दुतावास लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ते ठिकाणही 1200 किमी अंतरावर असल्याने तिथे पोहोचणे सुरक्षेच्या कारणांमुळे शक्य नाही, असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. या सगळ्या परिस्थितीत सुदानमध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे.
सांगलीसह भारतातील 450 हून अधिक नागरिक अद्यापही सुदानमध्ये अडकले आहेत. सुदानमध्ये गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परतण्याच्या आशा लागल्या आहेत. सध्या परराष्ट्र खात्याकडून भारतीयांना परत आण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून भारतीयांची सुटका सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील सुर्यगावमधील तानाजी पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आणखी दोन व्यक्ती सुदानमध्ये आहेत. त्यामुळे पाटील कुटुंबीय सध्या चिंतेत आहे. सुदानमधील केनाना शुगर कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे भारतीय दुतावासाला अवघड झाले आहे. सुटकेसाठी कुटुंबीयांनी शरद पवारांना मदतीची हाक दिली आहे.
आताच्या घडीला सुदानमधील भारतीय नागरिकांना युद्धाचा तितका धोका वाटत नसला तरी युद्ध वाढण्याची भीती आहे. त्यात युक्रेन सारख्या युद्धाचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे या नागरिकांना सुदानमधील युद्ध शांत होईपर्यंत आपल्या मायदेशात येण्याचे वेध लागले आहेत.
इतर देशांचे भारताला सहाय्य
फ्रान्सने त्यांच्या हवाईदलाच्या सहाय्याने पाच भारतीय नागरिकांना सुखरुपणे बाहेर काढले असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या राजनैतिक सूत्रांनी दिली आहे. या भारतीयांना इतर देशातील नागरिकांसोबत फ्रान्सच्या वायूदलाच्या विमानतळावर उतरवण्यात आले. सौदी अरेबियाने देखील सांगितले की, त्यांचे जवळचे संबंध असलेल्या देशांच्या 66 नागरिकांना सुखरुपणे सुदानमधून बाहेर काढण्यात आले. यात काही भारतीयांचा देखील समावेश आहे.
पंतप्रधांनांनी दिले नागरिकांना सुखरुप परत आणण्याचे निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदाममधील भारतीय नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासंर्दभातच शुक्रवारी 21 एप्रिल रोजी दिल्लीत अधिकाऱ्यांची बैठकसुद्धा झाली. तसेच सर्व भारतीय सुखरुपणे बाहेर येतील, असे आश्वासन देखील परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी दिले आहे. रविवारी भारताने सुदानमधील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हवाईदलाचे सी-130जे हे विमानसुद्धा तयार ठेवले.
आतापर्यंत सुदानमध्ये झालेल्या हिंसाचारात 500 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळे सुदानमधील परिस्थिती फार गंभीर आहे. त्यामुळे प्रत्येक देशाचे त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
संबंधित बातम्या:
Sudan : ऑपरेशन कावेरीत 'INS तेग' सामील, सुदानमधील भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु