लातूर : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सोबत आले तर ठीक, नाही आले तरीही ठीक, मात्र यावेळेस नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पंतप्रधान होऊ देणार नाही असा निश्चय वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बोलून दाखवला. सोमवारी लातूर येथील टाऊन हॉलवर वंचित बहुजन आघाडी आयोजित परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आलं होतं या सभेसाठी प्रकाश आंबेडकर हे लातूर येथे आले होते. यावेळी त्यांनी देशातील एकूण राजकीय परिस्थिती वर भाष्य केलं. त्यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) सडकून टीका केली आहे.


Prakash Ambedkar Latur Sabha : निवडणुकीपूर्वी देशात अराजकता निर्माण केली जाईल


लोकसभेची निवडणूक समोर ठेवत देशात दिवाळीनंतर अराजक परिस्थिती निर्माण करण्यात येईल असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. 'हिंदू खतरे मे है' हा संदेश देत हिंदुंना पाकिस्तान आणि मुसलमानांच्या विरोधात उभे केले जाईल. जो पाकिस्तान सध्या आर्थिक मंदीत अडकला आहे आणि विविध देशांसमोर भीक मागत आहे त्या पाकिस्तानची भीती भारतातल्या लोकांना घातली जाईल. जातीय तेढ आणि दंगली निर्माण करून हिंदुंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली जाईल. या सर्व बाबीचा लाभ फक्त भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस घेणार आहे. तरी सर्वसामान्य लोकांनी यांच्या भूलथापांना बळी पडू नये.


नरेंद्र मोदींची शक्ती क्षीण झाली आहे. भारतातल्या लष्करी जवानावर, अधिकाऱ्यांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. यात लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू होत आहे. इंदिरा गांधी यांच्या काळात असं झालं असतं तर पाकिस्तानचे पाच तुकडे झाले असते. मात्र मोदी यांच्याकडून हे शक्य नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


Prakash Ambedkar On Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याकडे निर्णयक्षमता नाही 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे निर्णयक्षमता नसल्याचं सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात शिवसेनेबरोबर सर्व काही ठरलं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षातील लोकांना ते नकोय. यामुळे विरोध होताना दिसतोय. तशीच परिस्थिती "इंडिया" बाबत होत आहे. राहुल गांधी एकीकडे अदानीला विरोध करताना दिसतात. मात्र त्याच वेळेस अदानीची बाजू घेणाऱ्या पवारांकडे ते जाऊन बसले आहेत. राहुल गांधी यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही.


आज लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांची जयंती आहे. त्यांना अभिवादन करतो. देशात सर्वप्रथम विचारांची क्रांती झाली त्यावेळी विचार मांडणारा ठराविक समूह होता. नंतर बहुजनातील विचारवंत पुढे आले. त्यांनी विचाराच्या कॅनवासवर अनेक विचार मांडले. आज जुन्याच पद्धतीचे विचार मांडले जात आहेत. जुनी विचारसरणी किंवा जुन्या पद्धती आणि चातुवर्ण लागू करण्याबाबत विचार होत आहे. जे कदापी होऊ देणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


नोकरभरतीच्या कंत्राटीकरणाला विरोध


राज्यात आणि देशात आज कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन दिलं जात आहे. जे सर्वार्थाने चुकीचं आहे. लोकशाहीमध्ये मुख्यमंत्रीपद आणि पंतप्रधानपद ही कंत्राटाने द्या असा मिश्कील टोला ही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. काँग्रेसने देशांमध्ये खाजगीकरण आणलं, भाजपा कंत्राटीकरण आणू पाहत आहे. लोकांच्या हाताला काम द्यावं, हे करता येत नसेल तर लोकांना झुलवत ठेवावं... हे सरकार तेच करत आहे अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली


Prakash Ambedkar On Sharad Pawar : पवारांचा उदो उदो.... मार्केटिंगचा फंडा 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तीस वर्षांपूर्वी किल्लारीला भूकंप झाला होता त्यावेळेस निळू फुले, राम नगरकर आणि मी काही तासातच किल्लारीला पोहोचलो होतो. लातूर आणि आजूबाजूच्या ठिकाणावरून अनेक डॉक्टर, वकील, नोकरदार आणि विद्यार्थी तिथे आले होते. शक्य तशी आणि शक्य तेवढी मदत ते करत होते. मात्र शरद पवार यांनी या लोकांना बोलवून घेऊन त्यांचा सत्कार करण्याऐवजी स्वतःचा सत्कार करून घेतला, स्वतःचा उदो उदो केला. त्यांची मुलगी त्यांच्या पायात चप्पल घालते याचं मार्केटिंग केलं गेलं. निळू फुले आणि राम नगरकर यांनी तिथल्या लोकांना धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी अक्षरशः जीवाचे राण केले होते.


टोपी काढतो, दहा लोकांना नोकऱ्या द्या


लातूर येथील परिवर्तन सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांना मुस्लिम पद्धतीची टोपी घातली होती. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, टोपी काढा असा मला एक एसएमएस आला. एखाद्या व्यक्तीचा पेहराव हा जातीवाचक कसा असू शकतो असा प्रश्न आहे. माझे केस कुरळे होते, पूर्वी डोक्यावर साईबाबासारखे मोठे केस असायचे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. मी ही टोपी काढतो, मात्र दहा जणांना नोकऱ्या द्या. माझ्या वेशभूषेवर किंवा एखाद्या जातीवाचक विषयावर बोलून वातावरण खराब करण्यापेक्षा लोकांच्या हाताला काम देणे आवश्यक आहे. 


युतीमध्ये किंवा महायुतीमध्ये सामील होणाऱ्या पक्षांना भाजपाकडून जेलची भीती दाखवली जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना जेलपासून मीच वाचू शकतो. ते माझ्याबरोबर आले तर ठीक, नाही आले तरीही ठीक. मात्र नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होऊ देणार नाही  असा निश्चय प्रकाश आंबेडकर यांनी लातूरच्या सभेमध्ये व्यक्त केला. 


ही बातमी वाचा: