Krishna River Fish Death : कृष्णा नदीत मृत माशांचा खच आढळून आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) कृष्णाकाठच्या विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), राज्य मत्स्य विभाग आणि सांगलीचे जिल्हाधिकारी यांचा समावेश असलेली एक संयुक्त समिती स्थापन केली आहे. ही समिती चार आठवड्यात आपला अहवाल सादर करेल. दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी 12 ऑक्टोबरला होणार आहे.
मृत माशांच्या कारणांचा अभ्यास करून दोषींवर कारवाई करण्याचेही आदेशही या समितीला देण्यात आले आहेत. सांगलीतील कार्यकर्ते सुनील फराटे यांनी नुकतीच एनजीटीकडे याचिका दाखल केली आहे. माशांच्या मृत्यूच्या घटनांमुळे सिंचन आणि पिण्यासाठी पाणी पुरवणाऱ्या नदीतील प्रदूषणाचा मुद्दा पुढे आला आहे. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.
याचिकाकर्त्याचे वकील ओंकार वांगीकर यांनी सांगितले की, आम्हाला प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध सकारात्मक कारवाईची गरज आहे जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. त्यामुळे आम्ही एनजीटीच्या पश्चिम विभागाकडे याचिका दाखल केली. न्यायालयाने एक संयुक्त समिती स्थापन केली असून या समितीने चार आठवड्यांत अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
यापूर्वी, एमपीसीबीने केलेल्या तपासणीत साखर कारखान्यांनी नदीला पूर आल्यावर मोलॅसिस मोठ्या प्रमाणात सोडल्याचे समोर आले होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, पाण्याच्या प्रवाहात कोणाच्याही लक्षात न घेता मोलॅसेस सहज वाहून जाईल, या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला होता. एमपीसीबीच्या पथकाने साखर कारखान्यांच्या डिस्टिलरी चालकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या