Vishal Patil: शाळांमधील विद्यार्थ्यांवर वाढत चाललेल्या ताणाचा गंभीर मुद्दा खासदार विशाल पाटील यांनी संसदेत उपस्थित केला. सांगली मतदारसंघातील खानापूर तालुक्यातील धवळेश्वर येथील शौर्य प्रदीप पाटील (Vishal Patil on Shaurya Patil Case) या विद्यार्थ्याने दिल्लीतल्या सेंट कोलंबस शाळेतील शिक्षकांकडून होत असलेल्या त्रासामुळे आत्महत्या केल्याची घटनेचा उल्लेख करत कारवाईची मागणी केली. या प्रकरणी एफआयआर दाखल झाला असला, तरी अद्याप कोणतीही अटक झालेली नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Continues below advertisement

विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव टाकतात, छळ करतात (Vishal Patil on RTE) 

देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण गेल्या दहा वर्षांत 8 हजारांवरून 13 हजारांपर्यंत वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. आरटीई कायद्यानुसार शाळांना इतर घटकांमधील 25 विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक खासगी शाळा हा नियम टाळण्यासाठी अशा विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव टाकतात, छळ करतात आणि शाळा सोडायला भाग पाडतात, असा आरोप त्यांनी केला.

जेणेकरून शिक्षकांना धडा मिळेल (Vishal Patil on Teacher) 

याप्रकरणी तत्काळ कारवाई करून दोषींना अटक करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली, जेणेकरून शिक्षकांना धडा मिळेल. तसेच आरटीईत असलेल्या उणिवा दूर करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. खासगी शाळांच्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करून शौर्य प्रदीप पाटील याला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात शौर्य पाटील आत्महत्येप्रकरणी झालेल्या सुनावणीत दिल्ली पोलिसांना या प्रकरणातील तपासाच्या प्रगतीबाबत त्वरित स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. पुढील सुनावणी 12 मार्च रोजी होणार आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय शौर्य पाटील या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणी करत न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली.

सीबीआयकडूनही प्रतिसाद मागवला

सुनावणीदरम्यान पोलिसांनी सांगितले की शाळेतील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून त्या फुटेजमध्ये शाळेविरुद्ध करण्यात आलेल्या काही आरोपांची पुष्टी होत असल्याचे प्राथमिक निष्कर्ष दिसत आहेत. याचिकेमध्ये प्रदीप पाटील यांनी तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात न्यायालयाने सीबीआयकडूनही प्रतिसाद मागवला आहे. शौर्यने आपल्या सुसाईड नोटमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापिकेकडून झालेल्या छळाचा उल्लेख केला होता. संबंधित शिक्षकांवर तक्रार दाखल असूनही कठोर कारवाई झालेली नाही, असा आरोप करत प्रदीप पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या