Nitin Gadkari on Pune-Kolhapur National Highway: खराब रस्त्यांवर टोल आकारला जाऊ नये असे स्पष्ट आदेश देऊनही कोल्हापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले विस्तारीकरणाचे काम आणि महाकाय खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे कोल्हापूर ते पुणे हे अंतर चार ते पाच तासांचे असताना आता तब्बल आठ ते नऊ तासांचा वेळ लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करत या रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार? या संदर्भात विचारणा केली. सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते कोल्हापूर रस्त्याबाबत भाष्य केले.
6 हजार कोटींचा डीपीआर तयार केला
सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, पुणे ते कोल्हापूर हा एक अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. त्यापैकी पुणे ते सातारा हा पूर्वी रिलायन्सकडे होता. आता आम्ही तो संपुष्टात आणत बदलला आहे. आम्ही सध्या या रस्त्याचा नवीन अभ्यास करत आहोत. आम्ही आमच्या बजेट तरतुदीतून पुण्यातील वेस्टर्न बायपासच्या सर्व्हिस लेनचे काम सुरू केले आहे. पुणे ते सातारा हा संपूर्ण मार्ग सुधारण्यासाठी आम्ही 6 हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे आणि लवकरच आमचा विभाग त्यावर काम सुरू करेल. यामध्ये, खंबाटकी घाटातील एक बोगदा लवकरच सुरु करत आहोत.
पुढील आठवड्यात माझी आढावा बैठक
गडकरी यांनी सांगितले की, सातारानंतर, कोल्हापूरपर्यंत काम आधीच मंजूर झाले आहे. या कामात थोडी अडचण आली आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात माझी आढावा बैठक आहे. पण यामध्ये ज्या सूचना होत्या, कोल्हापूरचे खासदार आणि बाकी लोकांनी जी काही माहिती दिली आहे ती आम्ही स्वीकारली आहे. आम्ही हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करत आहोत. संपूर्ण प्रकल्प एका वर्षात पूर्ण करू जेणेकरून बीसीएस कॅरेज आणि बंगळुरूकडे जाणाऱ्या कॅरेजमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या