सांगली : मातंग समाजाची फसवणूक करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत समस्त मातंग समाजाच्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी मातंग समाजाला दिशाभूल करून फसवणूक करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रकार समोर येत आहे. मातंग समाजाची फसवणूक करून धर्मांतर केले जात असल्याचा आरोप मातंग समाजाने केला आहे.
धर्मांतर करून समाजाची फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मातंग समाजाच्या विविध नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व मातंग समाज बांधवांनी मोर्चाद्वारे आंदोलन करत फसवणूक करून धर्मांतर करणाऱ्या वर कडक कारवाईची मागणी केली आहे.
बेडगमधील आंबेडकर समाजाचा पुन्हा मुंबईकडे लाँग मार्च
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील बेडग (ता. मिरज) येथील आंबेडकर स्वागत कमान पाडल्याप्रकरणी आंबेडकरी समाजाने आज पुन्हा मुंबईकडे लाँग मार्च सुरु केला आहे. माणगाव (ता. हातकणंगले) येथून मुंबईला पायी जाण्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव गावातून सकाळी रवाना झाले आहेत. प्रशासनाकडून करण्यात आलेलं आवाहन झुगारून समाजाने लाँग मार्च सुरु केला आहे. कमानीचा वाद गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडकाम करण्यात आलेली कमान शासन खर्चाने उभी करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही ग्रामस्थांनी त्याविरोधात भूमिका घेतली आहे. गावात कोणत्याही महापुरुषाच्या नावे स्वागत कमान उभी करायची नाही असा ठराव केल्याने वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेकडून कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत बेडग गावचे तत्कालिन ग्रामसेवक बी. एल. पाटील आणि विद्यमान नगरसेवक एम. एस. धेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पाडकाम सदोष असल्याचे दिसून आले होते. यानंतर गावचे सरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवकांना नोटीस पाठण्यात आली होती. कमान पाडल्याप्रकरणी बेडगच्या सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर 15 गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.
इतर महत्वाच्या बातम्या