सांगली : स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम आलेल्या विटा नगरपालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत आणखी एक पाऊल टाकले आहे. प्लास्टिकची समस्या सध्या भीषण आहे मात्र प्लास्टिकला आपण ठोस पर्याय देऊ न शकल्याने प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे प्लस्टिक कचरा दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर विटा नगरपालिकेने पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसे कापडी पिशव्याचे वेंडिंग मशीन शहरात रहदारीच्या ठिकठिकाणी बसवलेत. पाच रुपये टाकले की या एटीएममधून कापडी पिशवी बाहेर पडते.
देश आणि राज्य पातळीवर स्वच्छतेच्या बाबतीत बाजी मारली आहे. विटा नगरपालिका...स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम आल्यानंतर नगरपालिकेने स्वच्छतेच्या कामात पुन्हा नवनीवन प्रयोग करायला सुरुवात केलीय. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय मिळाल्याशिवाय सध्या प्लास्टिकचा होणारा बेसुमार वापर थांबणार नाही अशी परिस्थिती आहे. हा विचार करून रास्त दरात कापडी पिशव्या उपलब्ध केल्या आहेत. हे वेंडिंग मशीन विटा शहरातील बाजारपेठेत, भाजी मंडईमध्ये बसवण्यात आले आहेत. पाच रुपये टाकले की या एटीएम मशीनमधून चांगल्या पद्धतीची कापडी पिशवी मिळते यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा होणारा वापर कमी होण्यास मदत होत आहे.
विटा पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून पर्यावरण संवर्धन प्रदूषणाला आळा बसावा या उद्देशाने विटा शहरात च्या मार्केट मध्ये तसेच भाजी मंडई अशा विविध सार्वजनिक आणि व्यापारी भागात कापडी पिशव्यांची वेंडिंग मशीन बसवण्यात आली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पहिले कापडी पिशव्या वेंडिंग मशीन विट्यात बसवण्यात आले आहेत. ही सुविधा सर्व नागरिकांसाठी खुली आहे.
नागरिकांनी जास्तीत जास्त कापडी पिशवीचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्लास्टिक पिशव्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत नागरिक जागरूक झाले आहेत. पाच रुपये इतक्या कमी किमतीत या मशीनमधून पिशव्या मिळत आहेत. यामुळे विटा शहरात प्लास्टिक कचरामुक्तीची चळवळ जोर धरू लागली आहे. या उपक्रमास नागरिकांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे
या कापडी पिशव्या शिवण्याचे काम विटा मधीलच मन्नत महिला बचत ग्रुपच्या महिला करतात. दररोज साधारण पाचशे पिशव्या शिवण्याचं आणि ते नगरपालिकेला पुरवण्याचे काम या महिला करत असतात. आय स्मार्ट टेकोनो सोल्युशनच्या माध्यमातून अशा पध्दतीने हे वेंडिंग मशीन उभारले आहेत. विट्यात प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे एटीएम शहरातील विविध ठिकाणी बसवले आहेत.