Ajit Pawar on Love Jihad : लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम सुरू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे, मात्र आज जे समाजात सुरू आहे त्याविरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे होता, तसा तो होताना दिसत नसल्याची खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit Pawar on Love Jihad) व्यक्त केली. 


सांगली जिल्ह्यातील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अजित पवार बोलत होते. कासेगाव येथील क्रांतीवीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकासाठी दोन विधानपरिषद सदस्यांच्या निधीतून एकूण 22 लाख आणि सीएसआरमधून 5 लाख निधी देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केलं. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या आमदार निधीतून 11 लाख, आमदार जयंत पाटील, सातारचे शशिकांत शिंदे यांच्या आमदार निधीतून 11 लाख रुपये आणि सीएसआरमधून 5 लाख रुपये जाहीर असे एकूण 27 लाख जाहीर करण्यात आले.


अजित पवार म्हणाले, क्रांती वीरांगणा इंदूमती पाटणकर यांनी स्वातंत्रलढ्याबरोबर जाती अंताचा लढा उभा केला. त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले. आता सुद्धा याच भूमीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अलीकडे सेक्युलर या शब्दाला (Ajit Pawar on Love Jihad) कुठं तरी तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे आपल्या भारताच्या दृष्टीने अतिशय अडचणीचं होणार आहे."


शपथविधीवर भाष्य टाळले 


दरम्यान, अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य पडदा टाकला आहे. सारखं सारखं ते उगाळू नका. त्याला तीन वर्षे झालेली आहेत. त्यापेक्षा आपण महागाई, बेरोजगारी आत्ताचे जे काही यक्ष प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याबद्दल या मीडियाचाही वापर करून लोकांना जागृत करू, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा. कुणाच्याही धर्माने एखाद्या धर्माबद्दल आकस बाळगावा असं सांगितलेलं नाही. आपल्या धर्माची प्रार्थना आपापल्या धर्म मंदिरात करावी, घरात करावी. मात्र, बाहेर वावरताना प्रत्येकानं नागरिक या नात्याने वावरावं. 


इतर महत्वाच्या बातम्या