Sangli Crime : शेअर मार्केटमधील एक कोटीच्या वसुलीसाठी गुंतवणूक करून घेणाऱ्याच्या भावाचे सहा जणांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना कुपवाड भागात घडली. पत्ता विचारण्याचा बहाणा करत कुपवाडमधील तरुणाचे अपहरण करण्यात आले. मात्र, कुपवाड पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काही तासांमध्ये अपहरणाचा डाव उधळून लावत सहा जणांना अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली कार, हत्यार,मोबाईल असा 4 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रणव नामदेव पाटील (वय 23) असे सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे.  


5 ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कुपवाड येथून प्रणव पाटीलचे अपहरण करण्यात आले होते. त्याची पत्नी वैष्णवी यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या एक कोटी रुपयांच्या वसुलीसाठी हे अपहरण झाल्याचे देखील लगेच समोर आले. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की, संशयित आरोपी हे प्रणवला घेऊन वाहनामधून तासगावच्या दिशेने जाणार आहेत. 


त्यानुसार विटा- तासगाव रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. प्रत्येक वाहन तपासूनच पुढे सोडण्यात येत होते. याचवेळी संशयितांची मोटार तेथे आली. नाकाबंदी सुरू असल्याचे चालकाच्या अचानक लक्षात आल्याने त्याने पोलिसांसमोर भरधाव वेगाने वाहन पळवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी वाहन अडवत सर्वांना ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला.


प्रणव नामदेव पाटील (वय 23) असे सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजू रावसाहेब काळे (वय 28 रा. शरदनगर, कुपवाड), सागर सुखदेव ळेकर (वय 33, रा. वाघमोडेनगर, कुपवाड), किरण शंकर लोखंडे (वय 23, रा. बामणोली, ता. मिरज), सोन्या ऊर्फ बापू हरी येडगे (27, रा. बामणोली), संदेश रामचंद्र घागरे ( वय १९) आणि कल्पेश दिनकर हजारे (वय 21रा. दोघेही  वाघमोडेनगर, कुपवाड) यांचा समावेश आहे.


एलसीबीचे निरीक्षक सतीश यांच्या मार्गदर्शनाखाली, कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अविनाश पाटील, नीलेश कदम, गजानन जाधव, संदीप पाटील, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


प्रणवच्या भावाकडून पैशाबद्दल गुंतवणूकदाराना उडवा उडवीची उत्तरे 


काही लोकांनी प्रणवचा भाऊ पंकजकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक कोटी रुपये दिले होते. ओळखीतील काही जणांकडून पैसे घेऊन त्याने ते गुंतवले होते. मात्र, गुंतवलेल्या पैशाचे काय झाले? अशी विचारणा पंकजकडे केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे पैसे बुडाल्याच्या शक्यतेने एक कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पंकजचा भाऊ प्रणवच्या अपहरणाचा प्लॅन आरोपीनी आखला होता.