Jayant Patil : विधासभेच्या 288 जागा भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील, कारण तोपर्यंत शिंदे गट टिकेल असं मला वाटत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं. एकटा भाजप (BJP) महाविकास आघाडीच्या (MVA) समोर निवडणूक लढेल असंही पाटील म्हणाले. देशभरात भाजपच्या वतीनं स्थानिक पक्ष संपवण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रात देखील हेच काम त्यांनी सुरु केल्याचे पाटील म्हणाले. मित्र असो किंवा शत्रू त्यांना फोडणे, नामोहरम करणे आणि त्यांच्याकडे जाणारी मतं आपल्या बाजूला वळवून घेणे असा कार्यक्रम भाजपचा सुरु असल्याचे पाटील म्हणाले. मला खात्री आहे की शिंदेंना ऐनवेळी सांगितलं जाईल की त्यांच्या चार ते पाच ठिकाणी जागा निवडून येऊ शकतात. कारण भाजप सातत्याने सर्वे करत आहे. उरलेल्या सर्व जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करेल असेही पाटील म्हणाले.


बागेश्वर महाराजांना मराठी जनतेचा विरोध होणं स्वाभाविक


शेतकऱ्यांच्या मागण्या शिंदे-फडणवीस सरकारने पूर्ण केल्या नाहीत. सध्या केवळ सरकारकडून वेळकाढूपणा सुरु असल्याचे पाटील म्हणाले. बागेश्वर महाराजांच्या मुंबई दौऱ्यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. बागेश्वर महाराजांना मराठी जनतेचा विरोध होणं स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी अधिक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांनी तुकाराम महाराजांबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.


चंद्रशेखर बावनकुळेंच्या थेट वक्तव्याने जागावाटपात वाद होणार?


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातील भुवया उंचावल्या आहेत. बावनकुळे यांनी थेट केलेल्या वक्तव्यानंतर वाद होणार असे दिसताच त्यांचा व्हिडीओ डिलीट करण्यात आला. यानंतर बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, बावनकुळे यांच्या वक्तव्यावर भाजपकडून सावरासावर केली जात आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही कृषी मंत्री दादा भुसे यांनीही अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. 48 ते 50 जागांपुरतीच शिवसेनेची ताकद नसून विचारविनिमय करुन निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.


बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर सारवासारव 


चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आता भाजपकडून सारवासारव केली जात आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील 2024 च्या विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. माझ्या कानावर असं काही आलेलं नाही. बावनकुळे काय बोलले मला माहित नाही. जागा वाटप संदर्भात दोन्ही पक्षाच्या कोअर कमिटीत निर्णय होईल, जागावाटपाचा फार्म्युला त्या त्या पक्षाच्या क्षमतेवर ठरेल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.  


इतर महत्त्वाच्या बातम्या