Sangli News: ऐन सणासुदीत सांगलीत दोन खुनांच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिरजेत निखिल कलगुटगी या तरुणाचा खून झाल्याची घटना काल (27 सप्टेंबर) रात्री घडली. मिरजेच्या गणेश तलावजवळ निखिलवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान निखिल कलगुटगीचा मृत्यू झाला. अन्य एका घटनेत सांगली शहरातील शांतीनगरमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली. झोपेतच बायकोवर नवऱ्याने धारधार शस्त्राने वार करत हत्या केली. घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बायकोची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली. कोमल प्रशांत एडके असं मृत विवाहितेचे नाव आहे.
वर्चस्ववादातून निखिलचा खून
दरम्यान, निखिलच्या खुनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वर्चस्ववादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सर्फराज सय्यद आणि प्रतीक चव्हाणसह तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. संशयित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी ऋषिकेश कलगुडगीचा भाऊ रोहनवर तीन महिन्यापूर्वी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी फिर्यादीचा मामा मयत निखिल कलगुटगीने फिर्यादीस मदत केल्याचा राग मनात धरून गणेश तलावपासून तानाजी चौककडे जाणाऱ्या रोड फुटपाथजवळ आरोपींनी अचानक धारदार हत्याराने वार करून निखिलचा खून केला, असा संशय आहे. हल्ल्यामागे अन्य काही कारण आहे का याचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत.
बायकोचा झोपेतच मुडदा पाडला
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून कोमल आणि तिचा नवरा प्रशांत यांच्यामध्ये वाद सुरू होते. वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. पोलिसांनी समजूत काढत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा वाद काही मिटला नाही. कोमल तिच्या माहेरी मलकापूर या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास होती. शनिवारी प्रशांतने काजलची समजूत काढून तिला मलकापूरवरून घरी घेऊन आला होता. मात्र, आज सकाळी कोमल झोपेत असतानाच त्याने धारदार शस्त्राने वार करीत तिची हत्या केली. कोमलची हत्या केल्यानंतर प्रशांतने घराला बाहेरून कडी लावत थेट सांगली शहर पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून काजलचा मृतदेह सांगली सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. हत्येची बातमी वाऱ्यासारखी शांतीनगर परिसरामध्ये पसरली आणि बघ्यांची एकच गर्दी झाली.
इतर महत्वाच्या बातम्या