Sangli Crime : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी रात्रीत जेसीबी घालून केलेल्या पाडापाडीच्या जागेच्या ताब्यावरुन या जागेचे मालक आणि वहिवाटदार कब्जेदारांची दुसरी सुनावणी आज तालुका दंडाधिकारी यांच्याकडे मिरज तहसीलदार कार्यालयात 11 वाजता सुनावणी होणार आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत गाळेधारक वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे. 


मिरजेच्या 'त्या' जागेत नवा ट्विस्ट!


ब्रम्हानंद पडळकर यांनी रात्रीत जेसीबी घालून दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर नवा ट्विस्ट समोर आला आहे. मूळ जागा मालक असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती पुढे आली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये तालुका दंडाधिकाऱ्यांनी बुधवारपर्यंत पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जमिनीची कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. ज्या जागेवरील अतिक्रमण पाडले गेले त्या जागेचा आपण मूळ मालक असून जमिनीच्या मालकी हकाबाबत उच्च न्यायालयात केस सुरू आहे, असा दावा करणारी विष्णू लामदाडे ही व्यक्ती 2 दिवसाच्या राड्यानंतर समोर आली आहे.  


पडळकर यांनी बेकायदेशीर जमीन खरेदी केली आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, पडळकर यांनी (Brahmanand Padalkar) बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप विष्णू लामदाडे यांनी केला. आपल्यात आणि चड्डा यांच्यात या जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयात केस सुरू असल्याचा दावा लामदाडे यांनी केला. दरम्यान, विष्णू लामदाडे यांनी या जमिनीवर मालकी सांगणाऱ्या सगळ्यांवर गुन्हा दखल करा अशीही मागणी केली आहे. 


मिरज शहरात घरे व दुकाने जमीनदोस्त करणाऱ्यांवर कडक कारवाई करा


दरम्यान, मिरज शहरावर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना जबर शिक्षा झाली पाहिजे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. यासंदर्भात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस जिल्हापोलिस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांनी पाच सहा जेसीबीच्या सहाय्याने चारशे-पाचशे गुंड आणून मिरज शहरात दहशत निर्माण केली. स्वतःला वंचितांचे कैवारी समजणाऱ्या लोकांनीच वंचितांची व गरिबांची दुकाने व घरे उद्ध्वस्त केल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. 


राष्ट्रवादीने म्हटले आहे की, या ठिकाणी अनेक लोक जखमी झाले यावर पोलिसांनी काय कारवाई केली? हा हल्ला हा सांगली ,मिरज व कुपवाड महानगरपालिका शहरांवर बाहेरच्या गुंडांनी केलेला हल्ला आहे. शहराच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रकार असून या प्रकरणामध्ये महसूल व पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका नेमकी काय होती? ब्रम्हानंद पडळकर व त्यांच्या गुंडावर पोलिसांनी कोणती कलमे लावली आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हा शहरवासीयांना मिळायला पाहिजेत. 


इतर महत्वाच्या बातम्या