First Women Maharashtra Kesari : महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा आजपासून (23 मार्च) सांगलीत आयोजित करण्यात आली आहे. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून राज्यभरातून चारशेवर महिला मल्ल सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे. पहिल्यांदाच सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे.


प्रथम महिला कुस्तीगीरांची वजने घेतली जातील. त्यानंतर आज सायंकाळी आणि दुसऱ्या दिवशी स्पर्धा होतील. उद्या 24 मार्चला सायंकाळी सहा वाजता अंतिम कुस्ती होईल. स्पर्धेसाठी राज्यभरातून 45 संघांतून सुमारे 400 ते 450 स्पर्धक सहभागी होत आहेत. महापालिकेच्या संघांचाही सहभाग आहे. राज्यभरातील संघांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. विजेत्यांना चांदीची गदा आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटातील महिला कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्यात येणार आहे. 


सांगलीतील स्पर्धा अधिकृत 


स्पर्धा जाहीर झाल्यानंतर पुणे सांगली की कोल्हापूरमधील अधिकृत स्पर्धा यावरून वाद रंगला होता. या पार्श्वभूमीवर  सांगलीत होत असलेलीमहिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हीच अधिकृत आहे, अशी माहिती कोल्हापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिली आहे. पुण्यातील दोन गटांच्या राजकारणामुळे पैलवानांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.


व्ही बी पाटील यांनी सांगितले की, खासदार संजय मंडलिक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. राज्य कुस्तीगीर परिषदेकडून पत्र आल्यास शहर राष्ट्रीय तालीम संघ स्पर्धेला मान्यता देईल, असे आमचे म्हणणे होते. मात्र पत्र अद्याप मिळालेले नाही. सांगलीमधील स्पर्धेला कुस्तीगीर परिषदेने मान्यता दिली आहे. त्या स्पर्धेची जय्यत तयारी झाली असून, विविध जिल्ह्यांतील महिला सांगलीत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी घोषणा केलेली महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊ शकत नाही. ती घेण्याचा अधिकार राज्य कुस्तीगीर परिषदेला आहे. सय्यद यांनी महिलांची निमंत्रितांची स्पर्धा घ्यायचे ठरविल्यास त्याला शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ मान्यता देईल, असे पाटील यांनी नमूद केले. 


इतर महत्वाच्या बातम्या