Sadabhau Khot : सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार चालवत आहेत. या दोन माणसावर सध्या महाराष्ट्रामध्ये चांगलं काम सुरु असल्याचे वक्तव्य माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)  यांनी केले. दोन वाडपे जर व्यवस्थित वाढत असतील, तर 40 जणांची काय गरज आहे असं विनोदी वक्तव्य देखील सदाभाऊ खोत यांनी केलं. सरकार नसल्यावर लय वाईट परिस्थिती असते असेही ते म्हणाले. पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी जन्मशताब्दी निमित्त वाळवामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात सदाबाऊ खोत बोलत होते.


दरम्यान,  क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर एकत्र आले होते. यावेळी तिघांनीही सध्याच्या राजकीय स्थितीवर खुमासदार भाषण केलं. तसेच विरोधकांवर देखील जोरदार निशाणा लगावला.


शहाजीबापूंच्या डायलॉगमुळं रांगडी भाषा सातासमुद्रापार
 
सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांचा दाखला देत शहाजीबापू सुरत वरुन गुवाहटी आणि नंतर पुढे गोव्यात जाऊन पोहोचले. ते आता महाराष्ट्रातलं सरकार घालवून वाळव्याला आले  असल्याचेही खोत यावेळी म्हणाले. शहाजी बापूंच्या त्या एका डायलॉगमुळं रांगडी भाषा सातासमुद्रा पार गेली. शहाजी बापू शिवसेनेचे सरकार गेलं नाही, हे सेनेचेच  सरकार आहे. स्टेजवरील दोन माणसं निश्चित मंत्री होणार असल्याचेही खोत यावेळी म्हणाले. बापूचं तर ओके आहे, सगळं असे म्हणताच सभेत हशा पिकला. 


आमच्या सरकारमध्ये  एसटी कर्मचारी सुखी राहणार


सत्ता असताना  सकाळी सकाळी माणसाची घरासमोर 1 किलोमीट रांग असायची. सत्ता गेल्यावर मात्र सगळी गर्दी गायब झाली असेही खोत म्हणाले. आता एसटी कर्मचारी आमच्या सरकारमध्ये सुखी राहणार आहेत. शहाजी बापूंनाच परिवहन खाते देऊन टाकतो. आता तुम्ही म्हणालं हे पद वाटप करत बसलाय काय? असा विनोदही खोत यांनी केला.


मोबाईलमधील एका वाक्याने जगभर पोहोचवलं : शहाजी पाटील


हातातला मोबाइल जेवढा चांगला, तेवढाच वाईट असे म्हणत या मोबाईलमधील एका वाक्याने जगभर पोहोचण्याचं काम केल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. डोंगर, झाडी पार जगभर गेली. डोंगर-झाडानं माझं जरा चांगले दिवस आलेत असेही पाटील म्हणाले. पण अनेक ठिकाणी माझी पंचाईत देखील होत आहे. डोंगर, झाडीवाले आले म्हणत लोक गाड्या आडव्या लावतात आणि फोटो काढण्यासाठी एकच गर्दी होते असेही पाटील म्हणाले. बाहेर आता पहिल्यासारखे फिरता येत नाही, असेही शहाजी पाटील यावेळी म्हणाले.


महत्वाच्या बातम्या: