Gopichand Padalkar On Jayant Patil : महाविकास आघाडीची सत्ता गेल्याचं सुतक जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर आजही दिसून येतंय. सत्ता नसेल तर जयंत पाटील काम करू शकत नाहीत. आता शरद पवार कधी घरात बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो, अशी जयंत पाटलांच्या मनात घालमेल सुरू आहे, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित समारंभात गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित होते.
पडळकर म्हणाले की, विधान परिषदेचा एकीकडे निकाल लागला आणि दुसरीकडे शिवसेनेचे आमदार घेऊन एकनाथ शिंदे सुरतला गेले. काही दिवसातच महाविकास आघाडीची सत्ता देखील गेली. तेव्हापासून जयंत पाटील यांचा चेहरा सुतक असल्यासारखा झालाय असे पडळकर म्हणाले. इंग्रजांना तुम्ही घालवू शकता तर जयंत पाटलांना तुम्ही घालवू शकत नाही का? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित समुदायाला केला. आज भाचा सोडला तर जयंत पाटील यांच्या मागे कुणीही नाही अशी टीकाही पडळकर यांनी केली.
पडळकर म्हणाले की, सांगली जिल्हा बँकेत प्रचंड भष्टाचार झालाय. नोकर भरतीत देखील प्रचंड भष्टाचार झालाय.त्यामुळे बँकेवर प्रशासक लावायची मागणी आम्ही मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे पडळकर म्हणाले. शिंदे सरकारचा अजून विस्तार झाला नाही या टीकेचा देखील पडळकर यांनी समाचार घेतला. आज उद्या होईल ना सरकारचा विस्तार. हे चुलते-पुतण्याचे सरकार नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस जरी आता सरकार चालवत असले तरी ते दोघे भारी आहेत असेही पडळकर म्हणाले.
जयंत पाटील सत्ता असेल तरच काम करू शकतात. सत्तेच्या विरोधात ते काम करू शकत नाहीत. जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करायचा प्लॅन केला. 15 दिवसांपूर्वी पोलिसांवर दबाव टाकून एका अपघात प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप देखील पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केला. माझ्या विरोधात हद्दपारीची नोटीस आहे. पण आम्ही घाबरलो नाही, रोज लढत राहिलो असेही पडळकर म्हणाले. तसेच टेंभू योजनेला नागनाथ अण्णांचे नाव द्या अशी मागणीही पडळकर यांनी या कार्यक्रमातून केली. यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती असलेलले शहाजी बापू आता शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. म्हणून शहाजी बापूंच्या वर, आता महाराष्ट्रभर फिरायला हवे, त्याची ती जबाबदारी आहे असेही पडळकर म्हणाले.