Battis Shirala Nag Panchami : सांगली जिल्हा प्रशासनाने यंदाच्या नागपंचमी उत्सवासाठी बत्तीस शिराळा येथे ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे, कोणत्याही विधीसाठी सापांचा वापर होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांनी वन, महसूल आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. शिराळा शहरात 2 ऑगस्टला नागपंचमीनिमित्त लाऊडस्पीकरच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.
बत्तीस शिराळा हे शहर नागपंचमीला नागांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अन्वये ही परंपरा बेकायदेशीर असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आता या परंपरेवर बंदी घातली आहे. या कायद्यानुसार जिवंत साप पकडणे, पाळणे आणि मिरवणूक करणे याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 25 हजार दंडाची तरतूद आहे.
खिलारी यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना म्हणाले की, सण साजरा करताना, लोकांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही हे पाहावे. हजारो लोक बत्तीस शिराळ्याला भेट देतात आणि उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज असेल.
ते पुढे म्हणाले की, लाउडस्पीकर (75 डेसिबलपेक्षा जास्त) वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे, तर क्लोज-सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जाईल. नागरिकांनी नागपंचमी कायद्यानुसार पारंपारिक विधीप्रमाणे साजरी करावी. यामुळे लोकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होईल.
शिराळा शहरात 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वनविभागाचे अधिकारीही मैदानात असतील. शिवाय 52 ऑन रेकॉर्ड गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या