Sangli Crime News : सांगली पोलीस मुख्यालयाच्या आवारातील चंदन चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी अभिमन्यू चंदनवाले आणि रमेश चंदनवाले या दोघांना अटक करण्यात आली असून दोघेही मूळचे मिरजेचे आहेत. या दोघांकडून तीन किलो चंदन जप्त करण्यात आले आहे. दोघांनी रेकी करून पोलीस मुख्यालयातील चंदन चोरी केल्याचे समोर आलं आहे.
सांगली पोलीस मुख्यालयाच्या आवारात चंदनाची अनेक झाडे आहेत. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी पाऊस सुरू असल्याची संधी साधत मुख्यालयातील ट्रॅफिक पार्कमध्ये प्रवेश करून चंदनाची झाडे कापली व त्याचा बुंधा चोरून नेला होता. यापूर्वी देखील या भागातून चंदन चोरी झाली होती. या चोरीबाबात अधिक तपास करत असताना पोलिसांना खबऱ्यामार्फत वानलेसवाडी परिसरात दोघेजण चंदन विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली.
Sangli : सांगलीचा 'पुष्पा'! चक्क पोलिस मुख्यालय परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी
पथकाने तातडीने त्या परिसराकडे धाव घेत अभिमन्यू आणि रमेश चंदनवाले या दोघांना ताब्यात घेतले. एका संशयिताकडील पिशवीत तीन किलो 18 ग्रॅम चंदन मिळून आले. याबाबत विचारणा करता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी मुख्यालयातून चंदन चोरी केल्याचे कबूल केले. या दोघांना अधिक तपासासाठी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस मुख्यालयातील ट्रॅफिक पार्कमधील चंदनाच्या झाडांची चोरी
चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान पोलिस मुख्यालयातील ट्रॅफिक पार्कमधील चंदनाच्या झाडांची चोरी केली होती. याप्रकरणी पोलिस शिपाई दिपक तुकाराम वडेर यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली होती. चोरट्यांनी संबंधित झाडे करवतीने कापली. त्यानंतर फांद्याकडचा भागही कापून तेथेच टाकला आणि केवळ दोन बुंधे घेऊन पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे चार हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडांचे दोन बुंधे चोरीला गेल्याची नोंद केली होती.