Sangli Crime : सोलर बसवण्यासाठी फाईल मंजूर करण्यासाछी 45 हजार रुपयांची मागणी करणारे महावितरणचे दोन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. सांगलीच्या पलूस येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
तक्रारदार यांच्या कंपनीने सादर केलेल्या सोलर फाईल मंजूर करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता अतुल श्रीरंग पेठकर, यांना 45 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सहाय्यक अभियंता सागर विलास चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांवर पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी पलूस येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात सोलर बसवण्यासाठी फाईल सादर केली होती. ती फाईल मंजूर करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता अतुल पेठकर व सहाय्यक अभियंता सागर चव्हाण यांनी संबंधिताकडे 45 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत संबंधिताने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 28, 29 आणि 30 सप्टेंबर तसेच 3 ऑक्टोबर रोजी चौकशी केली होती.
पेठकर व चव्हाण यांच्या विरोधात सापळा रचून तक्रारीची शहानिशा करण्यात आली. यावेळी पेठकर व चव्हाण यांनी तक्रारदाराला 45 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज संबंधिताला पैसे घेऊन पेठकर व चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आले. यावेळी पेठकर यांनी तक्रारदाराला लाचेची मागणी करून 45 हजार रुपये स्वीकारल्याचे समोर आले. याप्रकरणी सागर चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
लाच मागितल्यानंतर कपडे काढून RTO अधिकाऱ्यांना देणाऱ्या कडेगावमधील तरुणावर गुन्हा दाखल!
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये आरटीओ अधिकाऱ्याने लाच मागितल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणाने स्वत:चे कपडे उतरवून देण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सांगली जिल्ह्यासह पोलिस दलातही खळबळ उडाली होती. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद मांडवे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. 12 ऑक्टोबर रोजी कडेगावमध्ये ही घटना घडली होती. आरटीओ कॅम्पमध्ये ट्रॉली पासिंगसाठी आपल्याकडे लाच मागितल्याचा आरोप त्याने केला होता.
लाच मागितल्यानंतर प्रमोदचा पारा चांगलाच चढला. त्याने आरटीओ अधिकाऱ्यांसमोर सरळ कपडे उतरवून देण्यास सुरुवात केल्यानंतर अधिकारीही बावचळले होते. कडेगावमधील या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. प्रमोद मांडवी हे आपली गाडी पासिंग करण्यासाठी कडेगाव आरटीओ कॅम्पमध्ये गेले होते.
इतर महत्वाच्या बातम्या